फोटो सौजन्य - नवराष्ट्र टीम
गेल्या शैक्षणिक वर्षात (२०२५) सीबीएसईने परीक्षा केंद्रावर १२ वीच्या परीक्षा घेतल्या होत्या. ज्यामध्ये देश-विदेशातील १९,२९९ शाळा सहभागी होत्या. गेल्या वर्षी एकूण ८८.३९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते, जे २०२४ च्या ०.४१ टक्क्यांनी जास्त होते. तसेच तेव्हा मुलींनी बाजी मारली होती. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण हे मुलांपेक्षा ५.९४ टक्क्यांनी जास्त होते. सुमारे १,२९,०९५ विद्यार्थी कम्पार्टमेंट श्रेणीत ठेवण्यात आले असून त्यांना पुन्हा संधी देण्यात आली होती.
जेव्हा भौगोलिकदृष्ट्या कामगिरीचा विचार केला जातो, तेव्हा बोर्डाच्या निकालावर भारताच्या दक्षिणेकडील शहरांचे वर्चस्व अधिक दिसून येते. देशात विजयवाडा शहर ९९.६० टक्क्यांनी अव्वल ठरले होते. तर तर त्रिवेंद्रम ९९.३२ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर होते. टॉप १० च्या यादीत चेन्नई, बेंगळुरु आणि दिल्लीच्या पश्चिम भागाची उत्कृष्ट कामगिरी होती. तर दिल्लीचा पूर्व भाग, चंदीगड, पंचकुला, पुणे, अजमेर यांनीही पहिल्या १० मध्ये आपले स्थान निश्चित केले होते. गेल्या वर्षीची आकडेवारी पाहता दक्षिण भारतातील शहरे आपले अस्तित्व कायम राखतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेल्या वर्षी सीबीएसईच्या निकालात नेहमीप्रमाणे सरकारी अनुदानित तसेच विनाअनुदानित शिक्षण संस्थानी बाजी मारली होती. जवाहर नवोद्य विद्यालय (JNV) आणि केंद्रीय विद्यालय (KV) यांची कामगिरी सर्वोत्कृष्ट राहिली होती. जेएनव्हीने ९९.२९ टक्क्यांच्या शानदार निकालासह सर्व संस्थांना मागे टाकले होते तर केंद्रीय विद्यालयांचा निकाल ९९.०५ टक्के लागला होता. इतर खाजगी शाळांच्या तुलनेत या संस्थेचा निकाल नेहमीच बोर्डासाठी अभिमानाचा विषय राहिला आहे.
यंदाच्या निकालाबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा उत्साह आहे. कारण यावर्षी डिजिटल मुल्यमापन प्रक्रियेद्वारे मुल्यांकन केले जाणार आहे. १७ फेब्रुवारी ते १० एप्रिल दरम्यान झालेल्या परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांचे नशीब आता लवकरच बोर्डाच्या वेबसाईटवर दिसणार आहे. तज्ञांच्या मते, यंदा विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत आणखी सुधारल्याचे दिसू शकते. आता विद्यार्थ्यांनी रोल नंबर आणि प्रवेशपत्र तयार ठेवावे कारण निकालाचा दिवस आता जवळ येत आहे.






