सुनिल गावस्करचा 'सूर्य'ला खास सल्ला (Photo Credit- X)
IND vs OMA: आशिया कप २०२५ मध्ये भारतीय संघाने दमदार कामगिरी करत सुपर-४ मध्ये आपले स्थान पक्के केले आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विजयरथावर स्वार झाला असून, त्यांनी आतापर्यंत यूएई आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना धूळ चारली आहे. आता त्यांचा पुढील सामना ओमानसोबत अबु धाबीमध्ये होणार आहे. दरम्यान, या सामन्यापूर्वीच भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी कर्णधार सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) प्लेइंग इलेव्हनबाबत महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
सोनी नेटवर्कसोबत बोलताना सुनील गावस्कर म्हणाले, “माझ्या मते जसप्रीत बुमराहला या सामन्यात विश्रांती द्यायला हवी. त्याला सुपर-४ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातूनही विश्रांती मिळाली पाहिजे, जेणेकरून तो २८ सप्टेंबरला होणाऱ्या मोठ्या सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त राहील. ओमानविरुद्ध तर बुमराहला नक्कीच विश्रांती द्यायला हवी.”
Sunil Gavaskar Wants Jasprit Bumrah Out Of Asia Cup Clash Against Pakistan. Here’s Whyhttps://t.co/FkXcMUF4S8 pic.twitter.com/yhFtdfgPRV
— CricketNDTV (@CricketNDTV) September 19, 2025
त्यांनी पुढे सांगितले की, भारतीय संघाने ओमानविरुद्ध प्रथम फलंदाजी करावी आणि सलामीच्या जोडीमध्ये कोणताही बदल करू नये. मात्र, सूर्यकुमारने स्वतः तिसऱ्या क्रमांकावरून फलंदाजीला न येता तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांना संधी दिली पाहिजे. यामुळे सुपर-४ मधील सामन्यांपूर्वी फलंदाजांना चांगली तयारी करण्याची संधी मिळेल.
भारतीय संघाने आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये उत्कृष्ट फॉर्म दाखवला आहे. गोलंदाजीत कुलदीप यादवने २ सामन्यांत ७ बळी घेतले आहेत, तर अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती देखील चांगली कामगिरी करत आहेत. फलंदाजीत अभिषेक शर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी चांगली लय पकडली आहे. यूएईला ९ विकेट्सने हरवल्यानंतर, टीम इंडियाने पाकिस्तानला ७ विकेट्सने धूळ चारली होती.
अबू धाबीतील शेख जायद स्टेडियमच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या रेकॉर्डनुसार, येथे आतापर्यंत एकूण ७४ सामने खेळले गेले आहेत.प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला३२ सामन्यांत विजय मिळाला आहे. तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला ४२ सामन्यांत विजय मिळाला आहे.या आकडेवारीनुसार, येथील खेळपट्टी लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघांसाठी अधिक फायदेशीर ठरते. या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १४५ ते १५० च्या दरम्यान आहे. भारतीय संघाने या मैदानावर आतापर्यंत फक्त एक टी-२० सामना खेळला आहे, ज्यात त्यांना विजय मिळाला होता.