(फोटो सौजन्य: Dehradun Tourism )
उत्तराखंडमधील देहरादूनला “मसूरीचे प्रवेशद्वार” म्हटले जाते. शहरापासून अवघ्या 14–15 किमी अंतरावर असलेली सहस्त्रधारा ही अशी एक रम्य जागा आहे, जिथे निसर्गाची अपार सुंदरता, शांतता आणि पवित्र वातावरण अनुभवायला मिळते. सहस्त्रधारा म्हणजेच हजारो धारांचा संगम. इथल्या डोंगरातून झरझर कोसळणारे पाण्याचे प्रवाह पाहताच मन मोहून जाते.
भारतातील असे काही अद्भुत बीच जिथे अनुभवता येतो अविस्मरणीय अनुभव; चांदण्याप्रमाणे चमकत इथल पाणी
निसर्गरम्य वातावरण
समुद्रसपाटीपासून जवळपास 600 मीटर उंचीवर वसलेली ही जागा चारही बाजूंनी हिरवाईने वेढलेली आहे. चुनखडीच्या गुहा, स्वच्छ आणि थंडगार पाण्याचे झरे, यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येकाला प्रसन्नता आणि शांती मिळते.
औषधीय गुणांनी युक्त पाणी
सहस्त्रधारेचं खास आकर्षण म्हणजे इथलं पाणी. या पाण्यात गंधकाचं प्रमाण जास्त असून त्याला औषधीय गुणधर्म लाभले आहेत. स्थानिकांच्या मते या पाण्यात स्नान केल्याने त्वचारोग, सांधेदुखी यांसारख्या अनेक विकारांपासून आराम मिळतो. त्यामुळे सहस्त्रधारा ही फक्त पर्यटनस्थळ नसून आरोग्यसंपन्न झरा म्हणूनही ओळखली जाते.
पौराणिक आणि धार्मिक महत्व
कथेनुसार इथे ऋषि धौली यांनी कठोर तप केला होता. त्यांच्या आशीर्वादाने या स्थळाला औषधीय गुण प्राप्त झाले, असे मानले जाते. काही परंपरांनुसार येथे भगवान शिवाचेही वास्तव्य मानले जाते कारण गुहांमध्ये शिवलिंग स्थापित आहेत. त्यामुळे हे स्थान श्रद्धास्थान म्हणूनही पूजले जाते.
महाभारतकालीन संदर्भ
अनेक मान्यतानुसार महाभारत काळात द्रोणाचार्यांनी या प्रदेशात तपश्चर्या केली होती. त्यामुळे या भागाला देहरादून (द्रोणांची देहरी) असे नाव पडले, असे सांगितले जाते. युद्धानंतर पांडव अपराधबोधाने व्याकुळ झाले असता त्यांनी देव-पूर्वजांच्या शांतीसाठी इथल्या पवित्र पाण्यात अर्पण केल्याची कथा प्रसिद्ध आहे. विशेषत: युधिष्ठिराने सहस्त्रधारेत पूजा करून पितरांच्या आत्मशांतीसाठी प्रार्थना केल्याचे म्हटले जाते.
पर्यटनासाठी उत्तम सोय
आजच्या काळात सहस्त्रधारा हे एक लोकप्रिय पर्यटनस्थळ बनले आहे. येथे रोपवेची सोय असून वरून परिसराचे अप्रतिम दृश्य पाहता येते. याशिवाय झऱ्यांच्या आसपास छोटे-छोटे तलाव तयार झालेले असून पर्यटक त्यात आनंदाने वेळ घालवतात. त्यामुळे कुटुंबासह फिरण्यासाठी ही उत्तम जागा आहे.
कसे पोहोचाल?
सहस्त्रधारा देहरादूनपासून अवघ्या 14 किमी अंतरावर आहे. येथे सहजपणे टॅक्सी, ऑटो किंवा खासगी वाहनाने जाता येते. वर्षभर येथे पर्यटकांची गर्दी असते; मात्र उन्हाळ्यात व पावसाळ्यात या ठिकाणी विशेष गजबज दिसून येते.
सहस्त्रधारा हे फक्त झरे पाहण्याचं ठिकाण नाही तर निसर्ग, अध्यात्म आणि आरोग्य यांचा संगम आहे. मग कोणी रोमांचाच्या शोधात आलेलं असो, धार्मिक श्रद्धा मनात घेऊन आलेलं असो किंवा आरोग्यलाभासाठी आलेलं असो. या ठिकाणी प्रत्येकासाठी काही ना काही अनुभवण्यासारखं नक्कीच आहे.
सहस्त्रधारा म्हणजे काय?
“सहस्त्रधारा” म्हणजे ‘अनेक धारेने पडणारे पाणी’. हा शब्द प्रामुख्याने नैसर्गिक झऱ्यासाठी वापरला जातो.
येथे काय काय आहे?
येथे नैसर्गिक धबधबे, गुंफा आणि गंधकयुक्त पाण्याचे झरे आहेत. तसेच, खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूंची विक्री करणारी दुकानेही आहेत.