६ वर्षीय मुलाच्या पोटात आढळली क्रिकेटबॉलच्या आकारमानाची गाठ!
खेळ व मौजमजेने भरलेले आयुष्य जगणाऱ्या एका सहा वर्षांच्या मुलाच्या आयुष्यातून अचानक त्याच्या या सगळ्या गोष्टी नाहीशा झाल्या होत्या. अत्यंत तीव्र स्वरूपाच्या पोटदुखीमुळे त्याच्या अवखळ आयुष्याला खीळ बसली होती. 1,00,000 मुलांमधून एकामध्ये आढळणारा गँग्लिओन्युरोमा नावाचा क्रिकेटबॉलच्या आकारमानाचा अॅड्रीनल (मूत्रपिंडावरील ग्रंथी) ट्युमर त्याच्या शरीरात असल्याचे निदान झाले. रायपूर येथे राहणारा हा मुलगा 1,000 किलोमीटर्सहून अधिक प्रवास करून त्याच्या पालकांसह फोर्टिस असोसिएट असलेल्या माहीमच्या एस. एल. रहेजा रुग्णालयातील पीडिअॅट्रिक सर्जरी विभागातील कन्सल्टण्ट डॉ. राजीव रेडकर यांच्याकडून उपचार घेण्यासाठी आला.(फोटो सौजन्य – iStock)
शरीरात साचलेले पाणी आरोग्यासाठी ठरेल अतिशय घातक! ‘हे’ घरगुती उपाय केल्यास शरीरातील पाणी होईल कमी
उजवीकडील अॅड्रीनल ग्रंथीमध्ये दिसून आलेली ही गाठ (ट्युमर) कॅन्सरची असल्याचा संशय होता. अॅड्रीनल ग्रंथी मूत्रपिंडांच्या वर असते आणि चयापचय, रक्तदाब व शरीराद्वारे तणावाला दिला जाणारा प्रतिसाद आदी कार्यांचे नियंत्रण करणाऱ्या हार्मोन्सची निर्मिती करण्याची जबाबदारी या ग्रंथीवर असते. वैद्यकीय पथकाने रुग्णाचा पोसिट्रॉन एमिशन टोमोग्राफी अर्थात पेट स्कॅनही केला आणि ती गाठ अन्य कोणत्याही भागात पसरली नसल्याचे त्यात दिसून आले. मेटास्टॅसिसची (पसरलेला कर्करोग) कोणतीही लक्षणे दिसत नसल्यामुळे या गाठीची बायोप्सी करण्याची गरज नाही असा निर्णय सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार केल्यानंतर घेण्यात आला. मात्र, ही गाठ यकृत आणि मूत्रपिंड यांच्यामधील भागात असल्यामुळे शस्त्रक्रिया आव्हानात्मक होती. अर्थात वैद्यकीय पथकाचे कौशल्य आणि धोरणात्मक नियोजन यांमुळे ती गाठ काढून टाकण्यात यश आले. शस्त्रक्रियेदरम्यान काढून टाकण्यात आलेली ती गाठ म्हणजे गँग्लिन्युरोमा नावाची निरुपद्रवी (बेनाइन) गाठ असल्याचे अखेरच्या हिस्टोपॅथोलॉजिकल निदानामध्ये स्पष्ट झाले.
फोर्टिस असोसिएट असलेल्या माहीमच्या एस. एल. रहेजा हॉस्पिटलमधील पीडिअॅट्रिक सर्जरी विभागातील कन्सल्टण्ट डॉ. राजीव रेडकर या शस्त्रक्रियेबद्दल म्हणाले, “गाठ ओटीपोटाच्या मागे खोल भागात होती, यकृत आणि मूत्रपिंडांच्या मधील भागात होती. शस्त्रक्रियेच्या दृष्टीने या भागातील गाठ ही आव्हानात्मक व क्वचित आढळणारी आहे. या जागेमुळे शस्त्रक्रिया नाजूक व गुंतागूंतीची झाली पण आम्ही अचूकता व काळजीपूर्वक हाताळणी यांच्या मदतीने ती काढू शकलो. कोणतीही गुंतागूंत निर्माण न होता गाठ पूर्णपणे काढून टाकली गेली, सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे कीमोथेरपीची गरज नव्हती. एक क्वचित मिळणारी आणि सुदैवी असे या निष्पत्तीचे वर्णन करता येईल. हा मुलगा आता पूर्णपणे बरा होण्याच्या मार्गावर आहे. अशा प्रकारची गाठ त्याच्या आयुष्यात पुन्हा तयार होईल की काय अशी चिंता पालकांना होती पण ती पुन्हा निर्माण होईल अशी कोणतीही लक्षणे आम्हाला तरी दिसत नाही आहेत.”
कुश अग्रवालचा विकारमुक्तीचा प्रवास आठवताना त्याचे वडील भावेश अग्रवाल म्हणाले, “माझ्या मुलाला पोट साफ होण्याच्या तक्रारी (मोशन इश्यूज) आणि ओटीपोटात दुखण्याचा त्रास सुरू झाला. आम्ही त्याला आमच्या शहरातील डॉक्टरांकडे घेऊन गेलो आणि त्यांनी आम्हाला त्याला मुंबईतील एसएल रहेजा रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. त्याच्या पोटात क्रिकेटबॉलच्या आकारमानाची गाठ आहे असे एसएल रहेजा हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सांगितल्यावर आम्ही फारच चिंतित झालो! त्या गाठीवर उपचार केले नाहीत, तर ती कॅन्सरस होण्याची शक्यता होती हे समजल्यावर तर आमची झोपच उडाली. अर्थात, डॉक्टरांनी खूपच मदत केली. शस्त्रक्रियेसाठी मनाची तयारी करण्याच्या दृष्टीने त्यांनी आमचे समुपदेशन केले.”
चहासोबत चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन! आतड्यांच्या होतील चिंधड्या, वाढेल पित्ताची समस्या
शस्त्रक्रियेनंतर कुश खूपच वेगाने बरा झाला आणि लवकरच त्याच्या वयाच्या मुलांप्रमाणे खेळूबागडू लागला. केवळ 15 -20 दिवसांतच तो शाळेत जाऊ लागला. मुलासोबतच आनंद आणि दिलासा घेऊन त्याचे कुटुंबिय रायपूरला परत गेले. आता कुश पूर्णपणे बरा झाला आहे आणि त्या गाठीचे कोणतेही लक्षण आता उरलेले नाही. भावेश अग्रवाल म्हणाले, “रोगमुक्तीच्या मार्गात आव्हाने नव्हती असे नाही पण वेळेत झालेले निदान, काळजीपूर्वक नियोजन आणि वैद्यकीय पथकाचे कौशल्य यांमुळे आमच्या मुलाचे भवितव्य आता उज्ज्वल आहे.”
तज्ज्ञांची मदत घेण्याचे महत्त्व, आधुनिक वैद्यकशास्त्राची शक्ती आणि क्वचित आढळणाऱ्या व कठीण विकारावर मात करण्यासाठी एका छोट्या मुलाने दाखवलेली प्रतिकूलतेशी जुळवून घेण्याची क्षमता हे सर्वच कुशबाबतीत दिसून आले.