उन्हाळ्यात सतत येणाऱ्या घामामुळे त्वचा चिकट आणि तेलकट होते? मग चेहऱ्यावर लावा 'हा' फेसपॅक, त्वचा राहील फ्रेश
राज्यासह संपूर्ण देशभरात झपाट्याने तापमानात वाढ होत आहे. अचानक पडणाऱ्या पावसामुळे हवामानात मोठा बदल झाला आहे. पाऊस पडून गेल्यानंतर वाढलेल्या गर्मीमुळे अंगाची काहिली होते. सतत येणाऱ्या घामामुळे चेहऱ्यावर जास्तीचे तेल जमा होण्यास सुरुवात होते. कडक उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर त्वचा टॅन होण्यासोबतच खूप जास्त चिकट आणि तेलकट होऊन जाते. त्वचेवर जमा झालेली धूळ, माती ओपन पोर्समध्ये जमा होते, ज्याच्या परिणामामुळे चेहऱ्यावर मोठे मोठे फोड आणि पिंपल्स येतात. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स त्वचेचे सौंदर्य पूर्णपणे नष्ट करून टाकतात. त्यामुळे उन्हातून कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर त्वचा स्वच्छ करणे फार आवश्यक आहे. तेलकट, चिपचिपित त्वचा अजिबात फ्रेश वाटत नाही. अशावेळी महिला वेगवेगळे उपाय करतात.(फोटो सौजन्य – istock)
चेहऱ्यावर जमा झालेले अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी बाजारात उपलब्ध असलेले विविध फेसवॉश वापरले जातात तर कधी फेस सीरम, फेस मास्क लावून त्वचेची काळजी घेतली जाते. पण वारंवार महागड्या केमिकल युक्त स्किन केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये घरगुती पदार्थांचा वापर करून फेसपॅक बनवण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला फेसपॅक त्वचेसाठी खूप जास्त प्रभावी ठरेल आणि त्वचा उजळदार करण्यास मदत करेल.
फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये मुलतानी माती घेऊन त्यात गुलाब पाणी मिक्स करा आणि पेस्ट तयार करून घ्या. तयार केलेली पेस्ट व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ब्रशच्या सहाय्याने संपूर्ण चेहऱ्यावर फेसपॅक लावून काहीवेळ तसाच ठेवा. १५ ते २० मिनिटं ठेवल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्या. यामुळे चेहऱ्यावर अतिरिक्त तेल होणार नाही. तसेच चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी होण्यास मदत होईल. मागील बऱ्याच वर्षांपासून मुलतानी मातीचा वापर त्वचेसाठी केला जात आहे.
नैसर्गिक पदार्थांचा वापर त्वचेसाठी केल्यास चेहऱ्यावर चमकदार ग्लो येतो आणि त्वचेवर आलेले काळे डाग कमी होण्यास मदत होते. तेलकट त्वचेवर वारंवार पिंपल्स येत असतील तर कडुलिंबाच्या पानांचा फेसपॅक चेहऱ्यावर लावावा. यासाठी मिक्सरच्या भांड्यात कडुलिंबाची पाने आणि थोडस पाणी घालून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर चिमूटभर हळद आणि बेसन मिक्स करून घ्या. त्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर फेसपॅक लावून काहीवेळ तसेच ठेवा आणि त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्वचा आतून स्वच्छ होण्यास मदत होईल. याशिवाय चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स सुद्धा कमी होतील.






