थंडीमुळे त्वचा रखरखीत आणि कोरडी झाली आहे? खोबऱ्याच्या तेलात मिक्स करा 'हे' आयुर्वेदिक पदार्थ
राज्यासह संपूर्ण देशभरात कडाक्याची थंडी पडली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्यासोबतच त्वचेसंबंधित समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवतात. त्वचा रखरखीत होणे, लालसरपणा, रॅश, त्वचा कोरडी पडणे, हातापायांना भेगा पडणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेची जास्त काळजी घ्यावी. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे आणि गारव्यामुळे त्वचेमधील पाणी कमी होऊन जाते, ज्यामुळे त्वचा डिहायड्रेट होऊन त्वचेच्या समस्या वाढू लागतात. अशावेळी महागड्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर, वेगवेगळे लोशन, क्रीम इत्यादी अनेक गोष्टी चेहऱ्यावर लावल्या जातात. मात्र यामुळे त्वचेमध्ये फारसा बदल दिसून येत नाही. त्वचा वरून मऊ दिसली तरीसुद्धा आतून अतिशय कोरडी आणि रुक्ष होऊन जाते. त्वचेला योग्य पोषण न मिळाल्यामुळे त्वचा खराब होऊन जाते. (फोटो सौजन्य – istock)
प्रत्येक स्वयंपाक घरात खोबऱ्याच्या तेलाचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. या तेलाचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. खोबऱ्याचे तेल केसांना सुद्धा लावले जाते. केस नैसर्गिकरित्या मऊ आणि चमकदार ठेवण्यासाठी केसांना नेहमीच तेल लावण्याचा सल्ला दिला जातो. या तेलात अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे त्वचेवर वाढलेले मुरूम, पिंपल्सचे डाग आणि इतर समस्या कमी होण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला कोरड्या त्वचेच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी खोबऱ्याच्या तेलात कोणते पदार्थ मिक्स करून लावावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
खोबऱ्याचे तेल कोरड्या त्वचेला पोषण देते. यासाठी वाटीमध्ये खोबऱ्याचे तेल घेऊन त्यात १ चमचा तूप आणि गुलाब पाणी मिक्स करून घ्या. या पदार्थांचा त्वचेवर कोणताही गंभीर परिणाम दिसून येत नाही. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून काचेच्या डब्बीमध्ये भरून ठेवा. यामुळे जास्त वेळ क्रीम व्यवस्थित टिकून राहील. खोबऱ्याच्या तेलात तूप मिक्स केल्यानंतर ते पांढरे होईपर्यंत व्यवस्थित फेटून घ्यावे. यामुळे क्रीम व्यवस्थित तयार होईल.
चेहऱ्यावर क्रीम लावण्याआधी त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कॉटनच्या टॉवेलने त्वचा कोरडी करा. त्यानंतर हातांना, चेहऱ्यावर आणि पायांवर लावून हलक्या हाताने मसाज करा. खोबऱ्याच्या तेलापासून बनवलेले क्रीम त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करते. त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कायमच नैसर्गिक आणि घरगुती पदार्थांचा वापर करावा. घरगुती पदार्थांच्या वापरामुळे त्वचेवर नैसर्गिक ग्लो टिकून राहतो.






