मासिक पाळी येण्याच्याआधी कंबर आणि पायांमध्ये वेदना का होतात?
महिलांच्या शरीरात वयाच्या प्रत्येक टप्प्यात सतत काहींना काही बदल होत असतात. मासिक पाळी, गर्भधारणा याशिवाय शरीरात होणाऱ्या इतर बदलांना महिलांना सामोरे जावे लागते. महिन्यातील चार ते पाच दिवस प्रत्येक महिलेला मासिक पाळी येते. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिला अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांना तोंड देत असतात. पाळी येण्याच्या ३ ते ४ दिवस आधीपासूनच पोटात दुखणे, कंबर दुखणे किंवा शरीरात थकवा अशक्तपणा जाणवणे इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात. शरीरात दिसून येणारी ही लक्षणे सामान्य असली तरीसुद्धा यामुळे महिलांना अनेक वेदना सहन कराव्या लागतात. मासिक पाळीमधील वेदना बऱ्याच महिलांच्या दैनंदिन जीवनशैलीवर परिणाम करतात.(फोटो सौजन्य – iStock)
मासिक पाळी आल्यानंतर सतत कंबर दुखणे, पाठ दुखणे, ओटीपोटात दुखणे, उलट्या, मळमळ, सतत चिडचिड होणे इत्यादी अनेक गंभीर लक्षणे शरीरात दिसू लागतात. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावे. मासिक पाळी येण्याआधी मूड स्विंगची समस्या प्रामुख्याने उद्भवते. आज आम्ही तुम्हाला मासिक पाळी येण्याच्या काही दिवसआधी कंबर आणि पाठदुखीची समस्या का उद्भवते? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
महिलांच्या शरीरात सतत हार्मोनल बदल होत असतात. हार्मोन्सचे असंतुलन झाल्यानंतर शरीरासह त्वचेवरसुद्धा परिणाम दिसून येतात. हार्मोन्समध्ये बदल झाल्यानंतर शरीरात प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेनच्या पातळीमध्ये सतत बदल होऊ लागतो. या बदलांमुळे गर्भाशयाच्या स्नायूंमध्ये आकुंचन होते, ज्यामुळे पाठ, कंबरेमध्ये वेदना वाढू लागतात.
महिलांच्या शरीरात प्रोस्टाग्लॅंडिन्स नावाचा हार्मोन्स आढळून येतो. प्रोस्टाग्लॅंडिन्समुळे मासिक पाळीच्या दिवसांमध्ये अतिशय तीव्र वेदना होऊ लागतात. हे हार्मोन्स गर्भाशयाच्या स्नायूंना आकुंचन पावण्यासाठी मदत करतात, ज्यामुळे मासिक पाळीच्या दिवसांमध्ये रक्तप्रवाह होतो. मात्र शरीरात प्रोस्टाग्लॅंडिनचे प्रमाण वाढल्यानंतर वेदना होऊ लागतात.
एंडोमेट्रिओसिसमध्ये शरीरातील गर्भशय बाहेरून वाढू लागते. यामुळे ओटीपोटात वेदना, पाठदुखी आणि पाय दुखणे, अंग दुखणे इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसू लागतात.
महिलांमध्ये प्रामुख्याने फायब्रॉइड्सची समस्या दिसून येते. गर्भाशयात फायब्रॉइड्सच्या गाठी तयार झाल्यानंतर महिलांच्या आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. फायब्रॉइड्स हे गर्भाशयात कर्करोग नसलेल्या गाठी आहेत. या गाठींमुळे सतत ओटीपोटात दुखणे. कंबर दुखणे, पाठ दुखणे इत्यादी अनेक गंभीर लक्षणे दिसू लागतात.