
Maharashtra Breaking News LIVE Updates Today:
12 Aug 2026 09:05 AM (IST)
NCP Restructuring Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) फेरबांधणी आणि संघटनात्मक विस्तारासाठी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची तयारी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री व पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे सर्व नेते लवकरच एका मॅरेथॉन बैठकीत एकत्र येऊन पक्षाच्या पुढील वाटचालीची रणनीती आखणार आहेत. संसद अधिवेशन संपल्यानंतर ही बैठक पार पडणार असल्याचे समजते.
राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतली होती. या दीर्घ चर्चेदरम्यान त्यांनी पक्षाच्या विस्तारासाठी आणि संघटनात्मक मजबुतीसाठी 'पूर्णवेळ कार्य करू शकणारा प्रदेशाध्यक्ष' नेमावा असा महत्त्वाचा प्रस्ताव ठेवल्याची चर्चा आहे.
12 Aug 2026 09:00 AM (IST)
Ambernath News: अंबरनाथ शहरात भारतीय जनता पक्ष (BJP) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजप कार्यालयाच्या वादावरून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि त्यांच्यात तुफान हाणामारी झाली. पोलीस ठाण्याच्या आवारातच भाजप कार्यकर्त्यांनी मनसेचे अंबरनाथ शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांना बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर संतप्त कार्यकर्त्यांनी शिर्के यांची चारचाकी गाडीही फोडली.
12 Aug 2026 08:55 AM (IST)
Ghatkopar Landslide News: मुंबईत रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे घाटकोपर येथील साकीनाका, गौसिया चाळ परिसरात एक भीषण दुर्घटना घडली आहे. सततच्या पावसामुळे डोंगराचा काही भाग अचानक कोसळून दोन ते तीन घरांवर दरड आली. या दुर्घटनेत ५ ते ६ नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल (Fire Brigade) आणि 'एनडीआरएफ'च्या (NDRF) तुकड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक आणि प्रशासकीय यंत्रणांकडून युद्धपातळीवर मदत व बचावकार्य राबवले जात आहे.
12 Aug 2026 08:45 AM (IST)
Shivsena Name & Symbol Hearing: शिवसेना पक्ष आणि 'धनुष्यबाण' चिन्हाबाबत ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाच्या परिसरात ठाकरे गट आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच बाहेर सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यावेळी वातावरणच चांगलेच तापले होते.
माध्यमांशी संवाद साधण्यापूर्वी शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात शाब्दिक चकमक झाली. दोघेही एकमेकांवर आक्रमकपणे बोलताना दिसले. दोन्ही नेत्यांमधील वाद वाढताना दिसताच ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई हे नरेश म्हस्के यांच्या दिशेने धावत गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसून आले.
12 Aug 2026 08:40 AM (IST)
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. ओडिसा, झारखंड यांसारख्या राज्यांत पावसाने अक्षरश: कहर केला आहे. मुसळधार पाऊस त्यानंतर आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच आता देशातील 19 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी 90 किमीपर्यंत पोहोचू शकतो. वाचा सविस्तर-
12 Aug 2026 08:35 AM (IST)
पालघर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच पालघर जिल्ह्यातील तलासरी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आपल्या मैत्रिणीसोबत फिरायला बाहेर पडलेल्या 19 वर्षीय तरुणीला सहा गुन्हेगारांनी धमकावून एका बंद पोस्ट ऑफिसमध्ये डांबून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली. वाचा सविस्तर-
Maharashtra Weather Updates: महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय; मुंबई-ठाण्यात १७ ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार
मध्य प्रदेशातील कमी दाबाचे क्षेत्र आणि कोकण किनारपट्टीच्या भागात मान्सूनचा ट्रफ (Monsoon Trough) सक्रिय झाल्याने महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल झाला आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, येत्या १७ ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाची ही स्थिती कायम राहणार असून, घाट परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.