जायकवाडीत ४७.८७ टक्के साठा! उन्हाच्या तीव्रतेने होतेय दररोज लाखो लिटर पाण्याचे बाष्पीभवन
मराठवाड्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या नाथसागर अर्थात जायकवाडी धरण्याच्या पाणीसाठ्यावर उन्हाच्या तीव्रतेचा मोठा परिणाम होत असून, दररोज कोट्यवधी लिटर पाणी बाष्पीभवनामुळे कमी होत आहे. वाढते तापमान, वाढती मागणी आणि सततचा पाण्याचा विसर्ग यामुळे धरणावर तिहेरी ताण निर्माण झाला आहे. गुरुवार (दि. ३०) रोजी धरणातील एकूण पाणीसाठा १७७७.३७७ दलघमी नोंदवण्यात आला असून, त्यापैकी जिवंत साठा १०३९.२७१ दलघमी अर्थात ४७.८७ टक्के आहे. गेल्या वर्षी याच दिवशी उपयुक्त साठा ८७५.३५० दलघमी (४०.३२%) इतका होता. छत्रपती संभाजीनगर शहरासाठी उभारण्यात आलेली समांतर जलवाहिनी योजना कार्यान्वित झाल्याने पिण्याच्या पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच डिएमआयसी अंतर्गत शेंद्रा औद्योगिक क्षेत्रासाठी सुरू असलेला पाणीउपसा ही अतिरिक्त गरज निर्माण करत आहे.(फोटो सौजन्य – AI)
जनगणनेसाठी तयारी झाली पूर्ण…! ९४ गावांत २०३ गटांची रचना, २५८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती
औद्योगिक विस्तार आणि शहरीकरणाच्या वाढत्या गरजा लक्षात घेता, धरणातील उपलब्ध साठ्यावर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. एप्रिलपासूनच तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून, मे महिन्यात ते ४३ ते ४५ अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग आणखी वाढण्याची शक्यता असून, साठ्यातील घट अधिक तीव्र होण्याचा धोका आहे. नाथसागर धरणावर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यांचा पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अवलंब आहे. तसेच लाखो हेक्टर शेती विशेषतः कापूस, ऊस आणि भाजीपाला ही कालव्यांच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे साठ्यातील घट ही केवळ आकडेवारीपुरती मर्यादित न राहता, ती थेट जनजीवन आणि अर्थकारणावर परिणाम करणारी ठरत आहे.
सध्या शेतीसाठी उजव्या कालव्यातून १५०० क्युसेक (३.६६९९ दलघमी) आणि डाव्या कालव्यातून २२०० क्युसेक (५.३८२५ दलघमी) पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाची पाणीपातळी १५१०.९२ फूट (४६०.५२८ मीटर) इतकी नोंदवली गेली आहे. विशेष म्हणजे, दररोज सुमारे १.९०२ दलघमी पाणी केवळ वाष्पीभवनामुळे कमी होत असून, हे प्रमाण कोट्यवधी लिटरमध्ये असल्याने धरणाच्या साठ्यावर मोठा परिणाम होत आहे.
समातर जलवाहिनी, औद्योगिक पाणीउपसा आणि शेतीसाठी सुरू असलेला विसर्ग या तिन्ही घटकामुळे धरणावर तिहेरी ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन, वापरावर नियंत्रण आणि दीर्घकालीन जलव्यवस्थापनाची अंमलबजावणी ही काळाची गरज बनली आहे. एकंदरीत्, दररोज कोट्यवधी लिटर पाणी बाष्पीभवनामुळे हवेत जात असताना वाढती मागणी ही परिस्थिती अधिकच गभीर करत असून, नाथसागर धरणाची धोक्याची घंटा आता स्पष्टपणे वाजू लागली आहे. आगामी उन्हाळा मराठवाड्यासाठी कठीण ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.






