लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली भटक्या-विमुक्तांचे भव्य धरणे आंदोलन
शासनाने भटक्या-विमुक्त समाजासाठी स्वतंत्र धोरण जाहीर करून आरक्षण, जातप्रमाणपत्र, शिक्षण, निवास आणि आर्थिक विकासासंदर्भातील प्रश्न तत्काळ सोडवावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली. घोषणाबाजी करत आंदोलकांनी शासनाच्या भूमिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. या आंदोलनात मूळ ४२ भटक्या-विमुक्त जमातींना स्वतंत्र आरक्षण देणे, अनुसूचित जमातींमध्ये समावेश करणे, हैद्राबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करणे, जातनिहाय जनगणना करणे तसेच जातप्रमाणपत्रासाठी १९६१ पूर्वीच्या पुराव्याची सक्ती शिथिल करून गृहचौकशीच्या आधारे प्रमाणपत्र देण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय निवासी अतिक्रमणांना नियमित मान्यता देऊन समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, आजही भटक्या-विमुक्त समाजातील अनेक कुटुंबे शिक्षण, रोजगार आणि शासकीय योजनांपासून वंचित आहेत. जातप्रमाणपत्रांच्या अडचणींमुळे विद्यार्थ्यांना आणि युवकांना मोठ्या प्रमाणावर अडथळ्यांचा सामना करावा लागत असल्याने शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. आंदोलनात नारायण जावळीकर, रामभाऊ जाधव, मछिंद्र जाधव, दत्ता पवार, हरिदास जाधव, अशोक जाधव, दिपक जाधव यांच्यासह विविध तालुक्यांतील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन प्रशासनामार्फत शासनाला पाठविण्यात आले.






