पाचगणीत अनधिकृत बंगल्यावर महसूल विभागाचा बुलडोझर; तहसीलदार सचिन मस्के यांच्या नेतृत्वाखाली कारवाई
पाचगणी : पाचगणीतील सिडनी पॉईंट परिसरात अनधिकृत बांधकामांवर महसूल विभागाने मोठी कारवाई सुरू केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार महाबळेश्वरचे तहसीलदार सचिन मस्के यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळपासून भला मोठा बंगला जमीनदोस्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली.
अनिल विजय मडगावकर यांच्या मालकीचा हा बंगला अनधिकृत असल्याचा दावा महसूल विभागाने केला आहे. मोठ्या जेसीबी आणि मशिनरीच्या सहाय्याने सुरू असलेल्या या कारवाईमुळे महाबळेश्वर-पाचगणी परिसरातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, गोव्यात शिपिंग व्यवसाय करणारे अनिल विजय मडगावकर यांनी या कारवाईवर आक्षेप घेतला असून, संबंधित बांधकाम कायदेशीर असल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. कोणतीही पूर्वपरवानगी किंवा नोटीस न देता बांधकाम पाडण्यात येत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.
बुलडोझर फिरवत मोठी कारवाई
दुसरीकडे, काही दिवसांपूर्वीच समर्थ मंदिर परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीला जबाबदार ठरत असलेल्या अतिक्रमणांवर सातारा पालिकेने सोमवारी बुलडोझर फिरवत मोठी कारवाई सुरू केली. पहाटेपासूनच पालिकेचे पथक, पोलीस बंदोबस्त आणि यंत्रसामग्री परिसरात दाखल झाल्याने समर्थ मंदिर परिसर रणांगणात बदलल्याचे चित्र पाहायला मिळाले. पालिकेने यापूर्वी अनेक वेळा नोटिसा बजावूनही संबंधित मिळकतधारकांनी अतिक्रमणे हटवण्यास टाळाटाळ केल्याने प्रशासनाने अखेर थेट कारवाईचा मार्ग स्वीकारला. आम्ही स्वतः काढून घेतो, अशी विनंती करत काहींनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी पालिकेने कोणतीही माघार न घेता नियोजित मोहिमेला सुरुवात केली. रुंदीकरण मोहिमेसाठी अतिक्रमण विभाग, बांधकाम विभाग, शहर विकास विभाग, आरोग्य विभाग आणि विद्युत विभागाची संयुक्त फौज मैदानात उतरली होती. शहर पोलीस, शाहूपुरी पोलीस आणि वाहतूक शाखेचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
Pimpri News : तुम्हीही अनधिकृत बांधकाम केलंय? तर आता महापालिकेचा हातोडा पडणार






