संग्रहित फोटो
मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) अनेक नवनव्या घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यात आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधला. ‘ज्यांना आम्ही सगळं काही दिलं ते निघून गेले. ज्यांना काहीच दिलं नाही ते सोबत राहिले’, असे त्यांनी म्हटले आहे.
आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाच्या नेतेमंडळींवर टीका केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘ज्यांना आम्ही सगळं काही दिलं ते निघून गेले. ज्यांना काहीच दिलं नाही ते सोबत राहिले. ज्यांना आम्ही कुटुंबातील मानायचो, परिवारातील मानायचो. त्यांच्यावर इतका विश्वास टाकला तरीही ते लोक निघून गेले. 20 मे रोजी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना घरी बोलावले होते. त्यांना सर्व गोष्टी विचारण्यासाठी घरी बोलावलं होतं.
तसेच जे काही नऊ महिन्यांपूर्वी घडलं त्यानंतर आम्हाला विचार करायला वेळ मिळाला नाही. याबाबत एकटा असताना विचार करतो तेव्हा वाईट वाटतं. ज्या माणसाने तुम्हाला सगळं दिलं त्याच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसता. पक्ष सोडणं वेगळी गोष्ट आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
पक्ष नुसता सोडला नाही तर चोरला
अनेक लोक पक्ष सोडतात, पण यांनी पक्ष नुसता सोडला नाही तर पक्ष चोरला. नाव चोरणं, चिन्ह चोरणं, जे काही आम्ही त्यांच्यासाठी केलं. ते विसरून आम्हाला शिव्याशाप देणं हे कितपत योग्य आहे? माणुसकीवरचा विश्वास उडवणारी ही गोष्ट आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे ‘मातोश्री’वर येऊन रडले
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारण्याआधी ते शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी आले होते. तेव्हा त्यांनी आपल्याला जेलमध्ये टाकलं जाईल या भीतीने ते रडले होते, असा मोठा गौप्यस्फोटही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.