मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ‘फडणवीस मला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत. त्यासाठी ते कट रचत आहेत. सलाईनमध्ये विष देऊन मला मारण्याचा विचार चालू आहे. माझा एन्काऊंटर करण्याचा फडणवीसांचा प्रयत्न आहे. असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला असून जरांगे पाटील आता उपमुख्यमंत्र्यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी निघाले आहेत. जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपानंतर राजकारणामध्ये चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागलं असून फडणवीसांनी राज्यातील राजकीय परंपरा, विचारसरणी मोडीत काढल्याचा आरोप केला आहे.
रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रोहित पवार म्हणाले, “आपल्या या महाराष्ट्रात धर्मवाद आणि जातीवाद कधीच नव्हता. कारण या भूमीत संतांच्या विचारांची, महापुरुषांच्या विचारांती ताकद आहे. मात्र देवेंद्र फडणवीस २०१४ साली जेव्हा मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून महाराष्ट्राची कोणतीही परंपरा कायम राहिली नाही. राजकीय परंपरा, विचारसरणी होती ती फडणवीसांनी मोडीत काढली. २०१४ सालानंतर महाराष्ट्रातील विचारांचं आणि राजकीय परंपरेचं नुकसान हे देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कोरेगाव भीमाची दंगल झाली. ही दंगल झाली की घडवली गेली हे बघावं लागेल. पण या दंगलीनंतर भाजपाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा झाला. आता देखील योगायोग म्हणा की चुकून ही बाब घडली समजा मात्र महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा असे चित्र निर्माण केले जात आहे. आता लवकरच लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा हे चित्र कोण निर्माण करतंय. असा सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी भाजपा हा जातीवादी पक्ष आहे, असा दावा करताना त्यांनी कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीचा दाखला दिला. रोहित पवार म्हणाले,“कर्नाटकच्या निवडणुकीत भाजपाने जातीवाद आणि धर्मवाद केला होता. भाजपाचा विचार प्रतिगामी आहे. भाजपाला धर्मवाद आणि जातीवाद यात रस आहे. कोणत्याही समाजाला आरक्षण मिळावं, असी भाजपाची भूमिका कधीही राहिलेली नाही, असा आरोप रोहित पवार यांनी केला.