Amol mitkari
मुंबई : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर महायुतीत काही आलबेल नसल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने टीका केल्यानंतर महायुतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एकटे पाडले जात असल्याचा आरोप काही नेत्यांकडून होत आहे. अशातच अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अकोल्यात माध्यमांशी बोलताना मिटकरींनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. ”अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं आणि वचिंतसोबत जावे, असे विधान मिटकरींन केले आहे. त्यांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मिटकरींच्या या विधानामागे अनेक कयास लावले जात आहेत.
वचिंत बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वत: ची कारकिर्द सुरू केली. लोकसभा निवडणुकांवेळी महाविकास आघाडीने त्यांचा छळ केला. पण हे आपले वैयक्तिक मत असून पक्षाने यावर विचार करावा, असेही मिटकरी यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच. काही लोक मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण प्रकाश आंबेडकर आणि अजित पवार एकत्र आले तर विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही नेते राज्याचे राजकारण पालटून टाकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्याचवेळी, अजित पवार यांनी महायुतीतून बाहेर पडावे, यासाठी दोन्ही मित्रपक्ष काम करत आहेत. असा धक्कादायक आरोपही त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला चारपैकी फक्त एकच जागा जिंकता आली. तर वंचित बहुजन आघाडीच्या एकही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचाही अकोला लोकसभा मतदारसंघात पराभव झाला. त्यात महाराष्ट्रात भाजपालाही नऊ जागांवर समाधान मानावे लागले. महाराष्ट्रात झालेल्या या नाचक्कीनंतर महायुतीत अजित पवार यांच्या गटाला दुय्यम वागणूक दिली जात असल्याची भावना राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आहे.
दोन-तीन दिवसांपुर्वीच शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी ‘अजित पवार महायुतीत थोडे उशिराने आले असते तर बरे झाले असते,’ असे विधान केले होते. कदम यांच्या या विधानावर, ‘अजित पवार वेळेत आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली उशिरा आले असते तर हिमालयात जप करायला जावे लागले असते. असा पलटवार अमोल मिटकरी यांनी केला होता.