पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कित्येक वर्षे काम केलेले, माजी नगरसेवक व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अनिस सुंडके यांनी नुकताच असदुद्दीन ओवैसी यांच्या ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमिन तथा एमआयएम या पक्षात प्रवेश केला आहे. ते लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले जात आहे.
सुंडके यांचा अभ्यास व जनसंपर्क दांडगा असल्याने ‘एमआयएम’ ने मुंडके यांना खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश दिला. सुंडके अपक्ष, काॅंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास करत आता वेगळी पावले टाकत आहेत. २०१७ च्या पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी हमीदा सुंडके निवडून आल्या होत्या. सुंडके यांचा पुण्यात नाना पेठ, भवानी पेठ तसेच कोंढव्यासह काही मुस्लिम बहुल भागात प्रभाव आहे.
अलिकडे अनिस सुंडके कुठेतरी नाराज असल्याचे सांगण्यात येत होते. लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना सुंडके यांना पक्ष प्रवेश देऊन एमआयएम लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे संकेत आहेत.
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा एकतर्फी विजय व्हावा यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वसंत मोरे यांनी वंचित विकास आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात पाऊल टाकले. त्यापाठोपाठ अनिस सुंडके लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे संकेत आहेत.
राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे की, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या मतांवर या दोन्ही घटकांचा परिणाम घडवून आणला जातो आहे की आणखी काही गणिते आहेत, या गोष्टी पडद्याआड आहेत. लवकरच काही गोष्टी स्पष्ट होतील.