कर्जत/संतोष पेरणे : गणेशोत्सव सण मोठ्या उत्साहात सुरू असून आता सर्व गणेश भक्तांना आतुरता असलेल्या गौराईचे आगमन आज रविवारी होत आहे. कर्जत तालुक्यात आज तब्बल 3850 गौराई यांचे आगमन होत असून उद्या सोमवारी गौराई मखरात विराजमान होणार आहे. कर्जत तालुका गणेश उत्सव सोहळ्याचे आनंदाचे वातावरण आहे. गौराईचे आगमन होत असताना ग्रामीण भागात महिला या देवीचे आगमन आपल्या हातांनी हळद आणि कुंकू यांची पावले घरापर्यंत काढून नेत असतात.तालुक्यात गौराई चे आगमन हे असे होत असताना तालुक्यात उद्या होणाऱ्या गौराई स्थापना साठी देखील महिला वर्गाची मोठी धावपळ सुरू असल्याचे बाजारात दिसून येत होते. गौराई साठी बांबूच्या पाती यांनी बनवलेली सुपे खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून येत होती.तर अनेक ठिकाणच्या गणेश कला मंदिर येथे महिला वर्ग आणि तरुणी या गौराईला आणण्यासाठी एकत्र जमल्या असल्याचे चित्र दिसत होते.
कर्जत तालुक्यात तब्बल 3850 घरी गौराई चे आगमन होत आहे.कर्जत पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या गावांमध्ये 1346घरी गौराई विराजमान होणार आहे.तर नेरळ पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या गावांमध्ये 1252भक्तांच्या घरी गौराई विराजमान होणार आहे.दीड दिवसांसाठी आगमन होत असलेल्या गौराईच्या स्वागतासाठी गावकरी आतुर झाले असून सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे.
शाडू किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस यांच्या मूर्ती मागील काही वर्षी मिळायला लागल्या आहेत.मात्र त्या पूर्वी जंगलातून हळदीची गुलाबी फुले आणि अन्य प्रकारची झाडांची पाने यांची गौराई बनवली जायची.त्यावेळी घरातील महिला वर्ग त्या फुलांची एक जुडी बनवून त्यावर साडी चोळी चढवून विविध प्रकारचे दागिने परिधान करून गौरी देवीची सजावट करायचे. सध्या अशाप्रकारची गौराई आणि त्या गौराई समोर पिठापासून बनवलेले दिवे अशी सजावट राहिली नाही पण नव्याने बनवलेल्या गौराई या विविध प्रकारच्या कपड्यांनी सजूनच गणेश कलाकेंद्रातून बाहेर निघत असतात.त्यामुळे गौराई ची विविध रूपे पाहण्यासाठी भक्त आतुर आहेत असेच चित्र सगळीकडे दिसून येत आहे.