वाई : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर वेळे, तालुका वाई येथे बुधवारी सकाळी दहा वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेला नागरिकांची उपस्थिती देखील लक्षणीय होती. ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेचे अध्यक्षस्थान सरपंच रफिक इनामदार यांनी भूषवले.
या ग्रामसभेत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. मात्र गावकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणून गावठाण विस्तार या ग्रामसभेत विशेष गाजला. १९८१ साली तत्कालीन जिल्हाधिकारी सातारा यांनी वेळे येथील गट क्रमांक ५०३/१ मधील सरकारी लष्करी तळ म्हणून असलेल्या जमिनीतील ३ एकर क्षेत्र हे राखीव गावठाण म्हणून घोषित केले आहे. तसे आदेश तहसीलदार वाई यांना देण्यात आले होते.
लोकसंख्या वाढीमुळे येथील नागरिकांना राहण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. स्वतः चे घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध होत नसलेने नागरिक हैराण झाले होते. गेल्या चाळीस वर्षांपासून राखीव गावठाण म्हणून घोषित करण्यात आलेल्या क्षेत्रात प्रत्यक्षात गावठाण वाढ झाली नव्हती. यामुळेच येथील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला जागा मिळणेसाठी अर्ज केले व तसा ठराव पास व्हावा, यासाठी ग्रामस्थ आग्रही राहिले. मात्र सदरील गट नंबरमध्ये चार ते पाच जणांचा कब्जा असल्याने त्यांनी ग्रामसभेत ही बाब न्यायप्रविष्ठ असल्याचे सांगितले. याबाबत त्यांनी ग्रामपंचायतीला काही कागदपत्रे सादर केली, मात्र सद्यस्थिती काय आहे याबाबत समाधानकारक माहिती ते देवू शकले नाहीत. ही एक प्रकारे ग्रामस्थांची दिशाभूल आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. यातूनच ग्रामस्थ व कब्जेधारक यांचेमध्ये वाद निर्माण झाला व तो विकोपाला गेला. त्यामुळेच नागरिकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. परिणामी ग्रामस्थांनी ही ग्रामसभा उधळून लावली भैरवनाथाच्या नावानं चांगभलं चा जयघोष करत ग्रामस्थ बाहेर पडले.
[read_also content=”पेपरच्या वाढत्या किंमतीमुळे झेरॉक्स व्यावसायिक त्रस्त https://www.navarashtra.com/maharashtra/xerox-business-suffers-due-to-rising-cost-of-paper-nrdm-314822.html”]
माजी जिल्हा परिषद सदस्याची जीभ घसरली
माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पवार यांना ग्रामसभेत राग अनावर झाल्यामुळे त्यांनी शिवीगाळ केली. त्याचे पडसाद देखील या ग्रामसभेत उमटले. ग्रामसभेत अशी शिवराळ भाषा वापरणे हा ग्रामसभेचा अवमान आहे, मात्र आपल्या पदाचा व कर्तव्याचा विसर पडल्याने त्यांचे तोंडून असे शब्द बाहेर पडत आहेत, त्यास आम्ही घाबरत नाही, असे ग्रामस्थांनी नमूद केले.