Bhiwandi News : भिवंडी महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने नालेसफाई करणारे कामगार सुभाष नवशा दिघे (वय 44, रा. मिठपाडा, शेलार) यांचा नाल्यात पडून मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. मृत कामगाराला न्याय मिळवून देण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने आज भिवंडी महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी आणि लढाऊ गाणी म्हणत ठिय्या आंदोलन करण्यात आले.श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्षा सीता घाटाळ आणि श्रमजीवी रयत कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष सुलतान पटेल यांच्या नेतृत्वाखाली हे आक्रमक आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले असून, शांतीनगर पोलिसांनी संबंधित महापालिका अधिकारी आणि दोषी कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
शांतीनगर पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मयत कामगार सुभाष दिघे हे केजीएन हॉस्पिटलच्या मागे नालेसफाईचे काम करत असताना नाल्यात पडले आणि गुदमरून त्यांचा मृत्यू झाला.सुरक्षा साधनांचा अभाव: कंत्राटदार बाळू खरात यांनी कामगारांना लाईफ जॅकेट, हेल्मेट, बूट यांसारखी कोणतीही सुरक्षा साधने पुरवली नव्हती, असा गंभीर आरोप मृत कामगाराच्या मुलीने केला आहे.
संघटनेचा सवाल: प्राथमिक माहितीनुसार कामगार नशेत असल्याचे सांगितले जात असले, तरी कंत्राटदाराने त्याच्या सुरक्षेची पुरेशी काळजी का घेतली नाही? असा रोखठोक सवाल संघटनेने उपस्थित केला.”ही घटना केवळ अपघात नसून, कायद्याने प्रतिबंधित असलेल्या ‘मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग’ (हाताने नालेसफाई) प्रथेमुळे व्यवस्थेने घेतलेला बळी आहे. आदिवासी समाज ढोर नाही, माणूस आहे. माणसाला माणसासारखे जगण्याचा आणि सुरक्षिततेचा अधिकार आहे. जनावरासारखे जिणे आम्ही सहन करणार नाही.”
सीता घाटाळ (अध्यक्षा, श्रमजीवी संघटना)
दिघे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सुभाष यांच्या पश्चात आता 24 वर्षांची मुलगी शुभांगी आणि 15 वर्षांचा मुलगा रितेश असा परिवार आहे. कुटुंबातील एकमेव कर्ता पुरुष गेल्यामुळे ही दोन्ही मुले आता पूर्णपणे अनाथ झाली आहेत.
आंदोलनाची दखल: 10लाखांची तात्काळ मदत जाहीर
आंदोलनाची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्तांच्या वतीने अतिरिक्त आयुक्त नयना ससाणे यांनी आंदोलनस्थळी येऊन संघटनेच्या शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा केली आणि तात्काळ आर्थिक मदत: संघटनेच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाने मृत सुभाष दिघे यांच्या अनाथ मुलांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत तात्काळ सुपूर्द केली.
कारवाईचे आश्वासन: दोषी कंत्राटदारावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासनही प्रशासनाने दिले आहे.
आंदोलनातील प्रमुख उपस्थिती: या आंदोलनात संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रेय कोळेकर, कार्याध्यक्ष बाळाराम भोईर,जिल्हाध्यक्ष अशोक सापटे,जिल्हा सचिव दशरथ भालके, ठाणे जिल्हा महिला प्रमुख जया पारधी, भिवंडी तालुका उपाध्यक्ष सागर देसक, श्रमजीवी कामगार संघटना चिटणीस महेंद्र निरगुडा, तालुका अध्यक्ष प्रदीप चौधरी, सचिव तानाजी लहांगे, जिल्हा उपाध्यक्ष मुकेश भांगरे (अंबरनाथ), भिवंडी शहर तालुका उपाध्यक्ष गुरुनाथ जाधव, गुलाब म्हसकर, कविता कदम, ठाणे तालुका सचिव नंदा वाघे, वाडा तालुका सचिव सूरज दळवी यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रमजीवी संघटनेने पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहून प्रशासनाला तात्काळ निर्णय घेण्यास भाग पाडल्यामुळे, परिसरात संघटनेचे कौतुक होत आहे.






