Chandrapur News: १ ऑगस्टपासून एसटी सवलतींसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक; चंद्रपूरमध्ये लाभार्थ्यांची गर्दी
यापूर्वी ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला आणि इतर सवलतधारक प्रवाशांना आधार कार्ड अथवा इतर ओळखपत्रांच्या आधारे तिकिटांमध्ये सवलत मिळत होती. मात्र, आता सवलतींचे वितरण अधिक पारदर्शक आणि डिजीटल पद्धतीने करण्यासाठी एनसीएमसी कार्ड प्रणाली लागू करण्यात येत आहे. त्यामुळे १ ऑगस्टनंतर संबंधित लाभार्थ्यांना सवलतीच्या प्रवासासाठी एनसीएमसी कार्ड आवश्यक ठरणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत ७१ हजार ६३३ प्रवाशांनी एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी केली. यामध्ये ५४ हजार १११ महिला, ९ हजार ३६० ज्येष्ठ नागरिक, ७ हजार ३०७ अमृत ज्येष्ठ नागरिक तसेच ८५५ अन्य प्रवाशांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
नोंदणीची संख्या मोठी असली तरी सर्व लाभाथ्यर्थ्यांपर्यंत कार्ड पोहोचलेले नाही. जिल्ह्यात आजपर्यंत ४४ हजार १५२ लाभार्थ्यांना स्मार्ट कार्डाचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये ३१ हजार ९२७ महिला, ६ हजार ७९४ ज्येष्ठ नागरिक, ४ हजार ९२३ अमृत ज्येष्ठ नागरिक आणि ५०८ इतर प्रवाशांचा समावेश आहे. यावरून अद्याप २७ हजार ४८१ नोंदणीकृत लाभार्थ्यांना कार्ड मिळणे बाकी असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे पुढील काही आठवड्यात कार्ड वितरण केंद्रांवरील गर्दी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्य स्तरावर पाहता, सुमारे ५१ लाख नागरिकांनी एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी – केली असून त्यापैकी २५ लाख कार्ड कार्यान्वित करण्यात आली. उर्वरित लाभार्थ्यांची कार्डही टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यभरात ४ हजारांहून अधिक एनसीएमसी कार्ड वितरण केंद्रे कार्यरत आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना सहजपणे कार्ड उपलब्ध व्हावे यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, एनसीएमसी प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार सहन केला जाणार नसल्याचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. जादा रक्कम आकारून कार्ड देणाऱ्या केंद्रांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच संबंधित केंद्रांचा परवाना रद्द करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
Mumbai Rain: अखेर मुंबईकरांना दिलासा! ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह मुंईबत पावसाचे आगमन
एसटीच्या सवलतीच्या योजनांचा लाभ सुरळीतपणे मिळण्यासाठी, तिकीट वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला डिजीटल स्वरूप देण्यासाठी एनसीएमसी प्रणाली महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकानी १ ऑगस्टपूर्वी आपले स्मार्ट कार्ड प्राप्त करून ते कार्यान्वित करून घ्यावे. – छगन दिवसे, विभागीय नियंत्रक, चंद्रपूर






