Chandrapur News: अपूर्ण महामार्ग कामांमुळे अपघातांचा धोका; नागरिकांकडून तातडीच्या कारवाईची मागणी
राजुरा ते तेलंगणा सीमेवरील परसोडा गावापर्यंत महामार्गाचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. मात्र या कामासाठी मोठ्या प्रमाणात माती, मुरूम व दगडाची वाहतूक करण्यात आल्याने परिसरातील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. धानोली-कुसळ माथा फाटा,बोरगाव, हातलोणी, रूपापेठ, पारडी, टांगारा, मांडवा, चनई आदी गावांतील रस्ते खड्डेमय झाले असून वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
देवघाट टोलनाका तसेच गडचांदूर उड्डाण पुलाचे काम पूर्ण झालेले नसतानाही सप्टेंबर २०२५ पासून टोलवसुली सुरू करण्यात आल्याबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करणे, खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती, प्रवासी निवारे उभारणे, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे आणि अपघात टाळण्यासाठी सुरक्षा उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी आबिद अली यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे निवेदनाद्वारे केली.
महामार्गाच्या कामादरम्यान अनेक ठिकाणच्या बोअरवेल हटविण्यात आल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच महामार्गाच्या दुभाजकांमध्ये वाढलेल्या गवत व झाडांमुळे जनावरांचा वावर वाढून वारंवार अपघात घडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली.
राष्ट्रीय महामार्ग-३५३ बीच्या कामादरम्यान अनेक जुन्या प्रवासी निवाऱ्यांचे विस्थापन करण्यात आले. मात्र आर्वी, हरदोना, थुटरा, धामणगाव, बेलगाव फाटा, वडगाव, रामपूर फाटा, देवघाट, लोणी माथा फाटा, कन्हाळगाव, अकोला, चोपन, रूपापेठ, कोठोडा, गोविंदपूर आणि दुर्गाडी येथे अद्याप नवीन प्रवासी निवारे उभारण्यात आलेले नाहीत. परिणामी, प्रवाशांना उन्हात व पावसात उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत असून महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने तातडीने प्रवासी निवारे उभारून मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली.






