छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा! (Photo Credit- X)
वातावरणातील बदलांमुळे तापमान सातत्याने वाढत असून तापमान ४१ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचत आहे. परिणामी सकाळी ११ वाजतापासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रस्ते निर्मनुष्य होत असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या उष्णतेमुळे दक्षता घेण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन विभागांना देण्यात आल्या आहेत. वाढत्या अनुषंगाने उष्णतेच्या जनजागृतीसाठी विशेष मोहिम राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. तर, या एसओपींची प्रभावी करण्याचे अंमलबजावणी व्यवस्थापन विभागाने केले आहे.
तसेच उष्मालाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी उन्हाळ्यात सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत शक्यतो बाहेर जाणे टाळावे. शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून भरपूर पाणी प्यावे आणि ओआरएस तसेच लिंबूपाणी, ताक, फळांचे रस यांसारखे घरगुती द्रव पदार्थ सेवन करावेत. हलके, सैलसर आणि सूती कपडे परिधान करावेत. डोक्यावर टोपी, गॉगल आणि छत्रीचा वापर करावा. उष्णतेच्या लाटेच्या वेळी थेट उन्हामध्ये कष्टाची कामे टाळावीत.
फ्रिजच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य कुटुंबांना फ्रिज खरेदी करणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत, ‘गरिबांचा फ्रिज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या माठांना मागणी वाढली आहे. नैसर्गिकरीत्या पाणी थंड ठेवणारे हे माठ आरोग्यदायी असल्याने नागरिक त्यांना पसंती देत आहेत. ४० ते ४२ अंश तापमानात गारव्यासाठी हेच माठ आता मोठा आधार ठरत आहेत.
वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. तापमानाचा पारा आणखी वाढणार असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, भरपूर पाणी प्यावे आणि दुपारच्या वेळी शक्यतो बाहेर जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
शेतात राबणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांना उन्हाचा सर्वाधिक फटका बसतो. त्यांनीही काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. कामाच्या वेळा बदलाव्यात. शेतीची कामे पहाटे लवकर किंवा संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर करा. दुपारच्या कडक उन्हात शारीरिक कष्टाची कामे टाळा. शेतात काम करताना डोक्याला पांढरा पंचा किंवा टोपी घट्ट बांधा जेणेकरून थेट उन्हाचा संपर्क येणार नाही. बाष्पीभवन टाळण्यासाठी पिकांना पाणी देताना ते सायंकाळी किवा रात्रीच्या वेळी द्यावे. शक्य असल्यास ठिबक सिंचनाचा वापर करा. पाळीव जनावरांना सावलीत बांधा. त्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या हौदात ताजे पाणी ठेवा आणि त्यांना दिवसातून किमान दोन वेळा अंघोळ घाला, असे आवाहन पाचोड ग्रामीण रुग्णालयातर्फे करण्यात आले.






