छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा पारा ४१.४ अंशांवर!
यंदा मार्चच्या अखेरीस उत्साहाची दाहकता वाढीस लागली आहे. एप्रिलमध्ये यात आणखी वाढ झाली. सकाळी ९ वाजेपासूनच। सूर्य तळपणे सुरु झाले आहे तर दुपारच्या वेळी सूर्य आग ओकत असल्याचे चित्र आहे. यातच उष्ण व कोरड्या वाऱ्यांमुळे उकाड्यात आणखीच भर पडत आहे. ही हिट वेव्ह आणखी काही दिवस कायम राहणार असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असून याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने उष्माघातापासून बचावासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. रविवारी ४० अंशापर्यंत गेले तापमान सोमवारी ४१.२ तर मंगळवारी विक्रमी ४१. ४ पर्यंत वाढले होते, उष्णता वाढल्याने १७ पर्यंत हवामानात बदल होणार आहेत. कमाल आणि किमान तापमानात ४ ते ५ अंशाची घट होण्याचा अंदाज आहे.
आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तहान लागलेली नसली तरीही दर अर्ध्या तासाने पुरेसे पाणी प्या. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी ओआरएस, लस्सी, लिंबू पाणी, ताक आणि कैरीचे पन्हे यांसारख्या घरगुती पेयांचा वापर करा, बाहेर पडताना हलके, पातळ आणि सच्छिद्र सुती कपडे वापरावे. डोके झाकण्यासाठी छत्री, टोपी किंवा ओल्या कापडाचा वापर करावा. दुपारी १२ ते ३ या वेळेत शक्यतो घराबाहेर जाणे टाळा. पाळीव प्राणी आणि गुरांना सावलीत ठेवा, त्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी द्या, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
प्रादेशिक हवामान केंद्राने संभाजीनगर शहर व जिल्ह्यासाठी १६ ते १८ एप्रिल या कालावधीमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली असून १५ व १६ एप्रिल रोजी ऑरेंज तर १७ एप्रिल रोजी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. या तिन्ही दिवशी शहर व परिसर अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिक आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. शहरात उन्हामुळे होणाऱ्या उष्माघाताच्या उपचारासाठी घाटीसह महापालिका, जिल्हा परिषदेतर्फे आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. आवश्यक डॉक्टर स्टाफ आणि औषधांची उपलब्धतताही करण्यात आली आहे.
पक्षी, खार अशा मुक्या जनावरांसाठी काही स्वयंसेवी संस्थांकडून पाण्याचे भांडे वाटप करण्यात आले आहेत. तर गाय, भटके श्वानांसाठीदेखील शहरात पाण्याचे भांडी ठेवण्यात आली आहेत.
चक्कर येणे, सतत घाम येणे, डोकेदुखी किवा अशक्तपणा जाणवल्यास ही उष्माघाताची लक्षणे असू शकतात. अशा वेळी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.






