फोटो सौैजन्य: गुगल
कर्जत/ संतोष पेरणे : पर्यटकांची लाडकी मिनी ट्रेन 1 दिवसासाठी बंद ठेवण्यात आली आहे. हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट दिल्यानंतर रात्रभर मुसळधार पाऊस झाला आहे. मात्र या काळात नेरळ माथेरान मिनी ट्रेन मार्गावर दरडी कोसळून कोणताही धोका पत्करावा लागू नये यासाठी नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेन बंद ठेवण्यात आली आहे.स्थानिक रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेनच्या दोन्ही फेऱ्या रद्द करण्यात आल्याने पर्यटकांची नाराजी व्यक्त केली.
सध्या मे महिन्याची सुट्टी सुरू असून थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरान मध्ये पर्यटकांची रीघ लागली आहे. डोंगरावरील माथेरान येथे जाण्यासाठी नॅरोगेज वर चालविली जाणारी मिनी ट्रेन असून या मिनी ट्रेन मधून प्रवास करण्याची संधी मिळावी म्हणून पर्यटक तासन् तास थांबून राहतात.नेरळ माथेरान नेरळ मार्ग २१ किलोमिटर लांबीचा असून या मार्गावर १५ किलोमीटर लांबीचा मार्ग हा डोंगराळ भागातून जातो.त्यामुळे या रेल्वे मार्गावर दरडी पावसाळयात कोसळण्याची शक्यता असल्याने ब्रिटिश काळापासून नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेन पावसाळ्यात बंद ठेवली जाते.त्यामुळे दरवर्षी जून महिन्यात नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेन बंद ठेवली जाते आणि ऑक्टोबर महिन्यात पुन्हा एकदा मिनी ट्रेन पर्यटकांच्या दिमतीला येते.मात्र यावर्षी मे महिन्यात अवकाळी पाऊस सुरू झाला आणि पर्यटकांनी धुक्यातून वाट काढणारी मिनी ट्रेन मधून प्रवास करण्याचा आनंद पर्यटकांनी मागील २० दिवस घेतला आहे.
परंतु यावर्षी २६ मे रोजी मौसमी पावसास सुरुवात झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केला आहे.त्याप्रमाणे नेरळ माथेरान भागात रात्रभर मुसळधार पाऊस झाला आहे. त्यावेळी अती मुसळधार पाऊस होण्याची शक्यता जाहीर करण्यात आली आहे.त्यात सर्वत्र मुसळधार पावसामुळे धुकेमय वातावरण निर्माण झाले असून माथेरान डोंगरात तर प्रचंड प्रमाणात धुके असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून नेरळ रेल्वे स्थानक आणि माथेरान रेल्वे स्थानक यांच्याकडून तसेच मिनी ट्रेनचे मार्गाची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या आयडबलू विभागाने २६ मे रोजी नेरळ येथून माथेरान साठी जाणाऱ्या सकाळच्या दोन्ही ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.सकाळी आठ वाजून ५० मिनिटांनी आणि नंतर दहा वाजून २५ मिनिटे या वेळेवर माथेरान साठी जाणाऱ्या दोन्ही गाड्या सकाळी रद्द करण्यात आल्या.तर माथेरान येथून नेरळ साठी निघणाऱ्या दोन्ही गाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत.त्याचा परिणाम माथेरानला जाण्यासाठी आलेले आणि माथेरान मधून आपल्या घरी परतण्याच्या तयारीत असलेले पर्यटक यांची गैरसोय झाली.
अनिल सानप, आयडबलू विभाग
घाटात दोन दिवसांपासून पाऊस आहे,त्यात धुके देखील प्रचंड असल्याने आम्ही स्थानिक प्रशासनाने निर्णय घेवून प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेवून मिनी ट्रेन रद्द करण्यात आली.