फोटो सौजन्य- सोशल मीडिया
महाराष्ट्र राज्य सरकारकडून नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना शासनाकडून राबविण्यात येत असून त्या अंतर्गत योजनेची रक्कम महिलांच्या खात्यात थेट जमा होत आहे. त्याचबरोबर राज्यशासनाची मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गारगोटी, कोल्हापूरमधून येथे करण्यात आला.
या योजने अंतर्गत पात्र असलेल्या जेष्ठ नागरिक लाभार्थ्यांना एक वेळ एक रकमी ३०००/- रुपयांच्या मर्यादित अनुदान दिले जाणार आहे. राज्यात आजपर्यंत या योजनेकरिता तब्बल १७ लाख २३ हजार ३० इतके अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यामधील पात्र असलेल्या ४० हजार २२० जेष्ठ नागरिक लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यावर डीबीटीद्वारे निधी वर्ग करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा शुभारंभ झाल्याचे गारगोटी येथे जाहीर केले.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी सुरू होणार
या एकवेळ एकरकमी 3000 रुपयांच्या अनुदानातून ज्येष्ठ नागरिकांनी आवश्यक असलेले सहाय्य उपकरणे खरेदी करावे तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादी शिबिरामध्ये सहभागी व्हावे असेही आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. कोल्हापुर जिल्ह्यातून सुरू झालेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेची आता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी सुरू होत आहे. योजनेचा शुभारंभ प्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये कोल्हापूरातील नामदेव गोपाळ भोसले आणि कांचन अप्पासो रेडेकर यांना योजनेचा तीन हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला. यावेळी आमदार प्रकाश अबीटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, उपविभागीय अधिकारी हरेश सूळ, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सचिन साळे आदी उपस्थितीत होते.
मुख्यमंत्री वयोश्री योजना
राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना वयोमानामुळे येणारे दिव्यांगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजनेकरिता, तेसेच आवश्यक सहाय्य उपकरणे, मनस्वास्थ्य केंद्र, योगउपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यामध्ये शासनातर्फे मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे.