संग्रहित फोटो
मेढा : सातारा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जावळी तालुक्यातील महिलांनी संपूर्ण जावळी तालुका दारू दुकान मुक्त केला, मात्र या तालुक्यात दारूबंदी असताना देखील दारू जोमात विक्री सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. अक्षरशा पोलिसांच्या वरदहस्तानेच तालुक्यात ही दारू विक्री होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे नवीन पोलीस अधिक्षकांनी जावळी तालुक्यातील अवैध व्यवसायांना लगाम घालावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. जावळी तालुक्यात दारूबंदी असताना देखील कुडाळ, करहर, केळघर, मेढा, सायगाव अशा बाजारपेठेंच्या गावांमध्ये राजरोसपणे अवैध दारू विक्री अव्वाच्या सव्वा दरामध्ये विकली जात आहे. गेले दहा वर्षांपासून तेच अवैध व्यावसायिक आजही अवैध दारू विक्री करताना पाहायला मिळत आहेत. मग यांना वरदहस्त नेमका कोणाचा ? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
तडीपार अवैध व्यवसायिक आता विकतोय ताडी
जावळी तालुक्यातील कुडाळ विभागात दारू मोठ्या प्रमाणात विकली जात आहे. एका व्यावसायिकाकडून तर देशीसह विदेशी दारू देखील विकली जात आहे. तर आता नव्यानेच या भागात यापूर्वी तडीपार झालेल्या एका अवैध व्यासायिकाकडून ताडी देखील विक्री सुरू आहे. मटका, अवैध दारू विक्री आता ताडी असा या अवैध व्यवसायिकाचा प्रवास सुरू असताना देखील मेढा पोलीस स्टेशनच्या “दप्तरी”याची नोंद कशी होत नाही? असा प्रश्न या विभागातील सजग नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
नूतनी एसपींनी तालुक्यातील अवैध व्यावसायिकांचे कंबरडे मोडले पाहिजे अशी मागणी होत आहे .तालुक्यात दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक कार्यरत असतानाही अवैध व्यवसायांवर कारवाई होत नाही ही खेदाची बाब आहे. कुडाळ बाजारपेठेत एकच व्यावसायिक गेली पंधरा वर्षाहून अधिक काळ अवैध व्यवसायात बक्कळ पैसा कमवत आहे. व या पैशातून अनेकांचे खिसे भरत असल्याने त्याच्यावर कारवाई होताना दिसून येत नाही. रेड झालीच तर कोणीतरी भलतीच व्यक्ती उभी करून कारवाईचा फार्स मेढा पोलिसांकडून केला जातो. त्यामुळे नूतन पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी या विभागातील अवैध व्यवसायांना लगाम घालावा अशी मागणी होत आहे.






