संग्रहित फोटो
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, नांदेड महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक १ मध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या पतीवर अज्ञात व्यक्तींनी तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. सोलापूरात एका उमेदवाराचा खुन झाला, अकोट व खालापूरमध्ये खून झाले. राज्यातील अनेक उमेदवारांना धमक्या देण्यात आल्या, त्यांच्या कुटुंबियांना धमकावण्यात आले, त्याचीच प्रचिती नांदेड मध्येही आली. विशेष म्हणजे हे सगळे उमेदवार विरोधी पक्षातीलच आहेत, जे आज सत्तेत बसलेल्या गुंड, मवाल्यांच्या भ्रष्टयुतीला भिडण्याची हिंमत दाखवताहेत. ते लढताहेत हीच त्यांची चुक आहे का ? याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावे, असे सपकाळ म्हणाले.
नगरपालिका निवडणुकीत जनतेने काँग्रेस पक्षावर विश्वास व्यक्त करत राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष बनवले. ४१ नगराध्यक्ष व १००६ नगरसेवक निवडून दिले, २००० ठिकाणी दुसऱ्या नंबरवर आले. महानगरपालिकेच्या निवडणुकीतही जनतेने काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करावे. कोणत्याही अमिषाला बळी न पडता लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी मतदान करा, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी : नाना पटोले
वाशिम जिल्ह्यातील गोगरी परिसरात मनरेगा योजने अंतर्गत संत्रा फळबाग अनुदान रखडल्याबाबत विचारणा केल्याने एका शेतकरी बांधवाला कृषी अधिकाऱ्याने बुटाने मारहाण केल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे. या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून संबंधित मुजोर अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी आणि पीडित शेतकऱ्याला तात्काळ न्याय द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे.






