' फरार कृष्णा आंधळेशी कोणाचे संबंध'; संतोष देशमुख प्रकरणावर आता धनंजय मुंडेंनी व्यक्त केला संशय
संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मीक कराडशी असलेल्या जवळच्या संबंधांवरून अजित पवार गटाचे मंत्री आणि बीडचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यावर मुंडेंनी बोलण्याचं टाळलं होतं. मात्र आज त्यांनी गेल्या एक महिन्यांनंतर भूमिका मांडली आहे. तसंच या प्रकरणात आरोप करणाऱ्या संदीप क्षीरसागर आणि इतर राजकीय नेत्यांवर संशय व्यक्त केला आहे.
राजीनाम्याच्या प्रश्नावर मी काहीही भाष्य करणार नाही. या प्रकरणात आरोप करणाऱ्या अंजली दमानिया, कागदपत्रं घेऊन मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटल्या आहेत. त्यामुळे त्यावर तेच अगदी स्पष्टपणे उत्तर देतील आणि ते उत्तर त्यांनीचं द्यावं, अशी माझी सुद्धा इच्छा आहे.
थर्मल प्लान्टमधून निघणाऱ्या राखेच्या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा २००६ चा जीआर पाहिलं तर थर्मल पॉवर स्टेशनची राख, कचरा. हा कचरा किंवा राख त्या थर्मल पॉवर स्टेशनने स्वत: पैसे खर्च करून उचललाच पाहिजे. हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे.
अशा निर्णयांच्या बाबतीत सरकारशी संबंध नाही, महाविजनिर्मिती एक वेगळं महामंडळ आहे. त्यामुळे या व्यवसायाशी प्रॉफीट ऑफ बिझनेसशी काही संबंध येत नाही.
कृष्णा आंधळेसोबत काहीतर वाईट घडलं असेल असं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं होतं. त्यावर धनंजय मुंडे म्हणाले, त्यांना जर याची इतकी माहिती असेल तर आणि यात आणखी कोणाकोणाला काय काय माहिती असेल, तर याचा अर्थ असा होतो की त्या आरोपींचे आणि यांचे काहीतरी संशय आहेत. संबंध असल्याशिवाय त्यांना ही माहिती मिळूच कशी शकते. त्या कृष्णाला काय झालंय याची माहिती पोलिसांना नाही. तुम्हाआम्हाला माहिती नाही. माध्यमांपर्यंत माहिती नाही, मग या लोकांना कशी माहिती असू शकते, असा सवाल मुंडेंनी केला आहे.
याचा अर्थ त्यांचा आणि यांचा कुठेतरी संबंध आहे आणि त्या संबंधातून अशा प्रकारच्या बातम्या पेरायच्या. आपल्याला ती माहिती मिळते आणि गेले महिनाभर माध्यमांवर बीडपलिकडे दुसरं काहीही दाखवलं जात नाही. त्यामुळे माध्यमांविषयी असलेला आदर कुठेतरी कमी होत चालला आहे. त्यामुळे माध्यमांनीही अशा प्रकरणांची शहानिशा करूनच बातम्या दिल्या पाहिजेत.
पण ज्या संतोष देशमुखची अतिशय निर्घुण हत्या करण्यात आली त्या आरोपींचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आहे. पहिल्या दिवशीही माझी हीच भूमिका होती आणि आजही तिच आहे, त्यात कोणताही बदल झालेला नाही, असं धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे.
काय म्हणाले संदीप क्षीरसागर ?
बीड मधील अनेक प्रकरण समोर येणार आहेत. लोकं स्वतःहून पुढे येऊन बोलत आहेत. संतोष देशमुख प्रकरणातील चौथा आरोपी कृष्णा आंधळे आता जिवंत नसेल असा मला संशय आहे.धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायलाच हवा त्याशिवाय चौकशी व्यवस्थित होणार नाही. बीड जिल्हा शल्य चिकित्सक चुकीच काही करत असतील असं मला अजिबात वाटत नाही.