छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासाठी ५ कोटींचा निधी मंजूर; उपमुख्यमंत्री शिंदेंचा २४ तासांत निर्णय
Dharashiv News Marathi: धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या दुरुस्ती व आधुनिकीकरणासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनंतर अवघ्या २४ तासांत शासन निर्णय निर्गमित झाल्याने प्रशासनाच्या तत्परतेचे दर्शन घडले आहे.
रविवार, १२ एप्रिलला धाराशिव दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत स्थानिक नाट्य कलावंतांनी नाट्यगृहाच्या सुधारणेसाठी अडीच कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यावर तत्काळ प्रतिसाद देत “अडीच काय मागता, पाच कोटी घ्या!” असे जाहीर करत त्यांनी दुप्पट निधीची घोषणा केली. तसेच तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. या घोषणेनंतर प्रशासनाने तातडीने हालचाली करत सोमवारी (१३ एप्रिल) शासन निर्णय जारी केला. त्यामुळे दिलेल्या आश्वासनाची तात्काळ पूर्तता झाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत असून उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यशैलीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या निधीतून नाट्यगृहाचे आधुनिकीकरण, दुरुस्ती, अत्याधुनिक सुविधा उभारणी तसेच परिसराचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी ९० टक्के निधी राज्य शासनाकडून, तर १० टक्के निधी नगरपरिषदेकडून उचलला जाणार आहे. सर्व कामे ई-निविदा प्रक्रियेद्वारे पारदर्शक पद्धतीने केली जाणार असून तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेनंतरच अंमलबजावणी होईल. कामांची गुणवत्ता अबाधित राहावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांवर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रत्येक टप्प्यावर देखरेख, लेखापरीक्षण आणि प्रगती अहवालावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. तसेच पाणीपुरवठा व मलनिस्सारणाच्या कामांशी समन्वय साधूनच इतर पायाभूत सुविधा विकसित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पाणीप्रश्न सोडविण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असल्याचे नमूद केले. वॉटर ग्रिड प्रकल्पाला गती देत दीर्घकालीन व शाश्वत पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्यात आली. धाराशिव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४५० पदांना मंजुरी देत ४५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून नवीन इमारत, अधिकारी-कर्मचारी निवासस्थाने व वस्तीगृहासाठी ५५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पासाठी ३५ एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तसेच २५० खाटांच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी २५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गासाठी ४५२ कोटी रुपये मंजूर करून कामाला गती देण्यात आली आहे. याशिवाय कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी तब्बल ११ हजार ७०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
कुलस्वामिनी तुळजाभवानी देवींच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी १८६८ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला असून मे २०२६ मध्ये भूमिपूजन अपेक्षित आहे. तसेच परंडा, भूम व वाशी येथे उपजिल्हा रुग्णालये, परंडा येथे महिला उपजिल्हा रुग्णालय, तसेच तेरखेडा, ढोकी व येडशी येथे ग्रामीण रुग्णालयांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.
शहर विकासासाठी धाराशिव शहरासाठी १५४ कोटी, भूमीगत गटार योजनेसाठी २५० कोटी, परंडा शहरासाठी ११७ कोटी, भूमसाठी १३७ कोटी, उमरग्यासाठी १३६ कोटी, कळंबसाठी ९२ कोटी आणि तुळजापूर शहरासाठी ११५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या सर्व प्रकल्पांमुळे धाराशिव जिल्ह्यात आरोग्य, पायाभूत सुविधा, सिंचन आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विकास होत असून नाट्यगृहासाठी मंजूर झालेल्या ५ कोटींच्या निधीमुळे सांस्कृतिक क्षेत्रालाही नवी उभारी मिळणार आहे.
परळमधील स्मारक कागदावरच! बाबासाहेबांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक करण्याची केली होती घोषणा






