Sunny Deol प्रदीर्घ काळानंतर पत्नी पूजा देओलसोबत एकत्र स्पॉट (Photo Credit - X)
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सनी देओल त्याच्या लक्झरी कारमधून उतरताना दिसत आहेत. यावेळी त्याने ऑलिव्ह ग्रीन रंगाचा शर्ट, ब्लू डेनिम जीन्स, पांढरे स्नीकर्स आणि काळे सनग्लासेस असा कूल लुक परिधान केला होता. त्यांच्या हातात एक लहान ट्रॅव्हल बॅगही पाहायला मिळाली. दुसरीकडे, गेल्या अनेक वर्षांपासून लाइमलाईट आणि कॅमेऱ्यांपासून लांब राहिलेल्या पूजा देओलने बेज रंगाचा शर्ट आणि काळी पॅन्ट असा अत्यंत साधा पण शोभिवंत पेहराव केला होता. विमानतळाच्या सुरक्षा गेटकडे जाताना सनी देओलने आधी धावत पुढे जात सुरक्षा तपासणीच्या ठिकाणी पत्नी पूजाची वाट पाहिली आणि त्यानंतर आदराने तिला पुढे जाऊ देऊन स्वतः त्यांच्या मागे चालू लागले. त्यांच्या या कृतीचेही चाहत्यांकडून कौतुक होत आहे.
Sunny Deol heads to Manali for a short break after Antony schedule and dubbing of Ikka . pic.twitter.com/yPU4Cr3A8p — LegendDeols (@LegendDeols) May 26, 2026
बॉलिवूडच्या झगमगाटात राहूनही देओल कुटुंबातील महिलांनी स्वतःला प्रसिद्धीच्या वलयापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले आहे, हा इतिहास आहे. सनी देओल यांच्या पत्नी पूजा देओल या तर गेल्या अनेक दशकांपासून मीडियासमोर आलेल्या नाहीत. केवळ पूजाच नव्हे, तर सनी देओल यांचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांनीही चित्रपटसृष्टी आणि कॅमेऱ्यांपासून नेहमीच अंतर राखले आहे. याशिवाय सनी देओल यांच्या दोन्ही बहिणी विजेता देओल आणि अजिता देओल यादेखील कधीच कोणत्याही फिल्मी पार्ट्यांमध्ये किंवा मीडिया कव्हरेजमध्ये दिसत नाहीत.
सनी देओल आणि पूजा देओल यांचा विवाह 1980 च्या दशकात झाला होता. सनी देओल यांना मिळालेली अफाट लोकप्रियता आणि स्टारडम बाजूला ठेवून पूजा यांनी नेहमीच आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांना प्राधान्य दिले. काही वर्षांपूर्वी त्यांचा मोठा मुलगा करण देओल याच्या लग्नसोहळ्यात पूजा देओल यांचे दर्शन घडले होते. त्यानंतर प्रदीर्घ कालावधीनंतर त्या थेट आजच सनी देओल यांच्यासोबत कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत.
गेल्या चार दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत सक्रिय असलेले सनी देओल हा बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात यशस्वी ॲक्शन हिरो मानले जातात. ‘घायल’, ‘दामिनी’, ‘बॉर्डर’, ‘जीत’ आणि ‘इंडियन’ यांसारख्या सदाबहार चित्रपटांपासून ते नुकत्याच गाजलेल्या ‘गदर 2’ च्या ऐतिहासिक यशापर्यंत त्यांनी प्रत्येक पिढीतील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. सध्या सनी देओल त्यांच्या आगामी मोठ्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. येत्या काळात तो आमिर खान निर्मित ‘लाहौर 1947’, नितेश तिवारी दिग्दर्शित महाकाव्य ‘रामायण’ आणि ‘गबरू’ यांसारख्या बहुप्रतिक्षित आणि बिग बजेट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.






