'नवभारत हेल्थकेअर कॉन्क्लेव्ह २०२६' मध्ये डॉ. पूजा शिंदे-कदम यांना 'नवभारत आरोग्य पुरस्कार'
डॉ. पूजा शिंदे-कदम यांनी २०१८ मध्ये बीएएमएस पदवी संपादन केली. २०१९ मध्ये कोल्हापूर महापुराच्या काळात त्यांनी वैद्यकीय मदत शिबिरांमध्ये सहभागी होत पूरग्रस्तांना आरोग्यसेवा दिली. २०२१ मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) कोविड लसीकरण केंद्रात त्यांनी महत्त्वपूर्ण सेवा बजावत नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी मोलाचे योगदान दिले. विविध स्वयंसेवी संस्थांसोबत अनेक मोफत वैद्यकीय शिबिरांमध्ये सहभाग घेऊन त्यांनी समाजसेवेची परंपरा सातत्याने जपली.
२०२२ ते २०२५ या कालावधीत त्यांनी कान-नाक-घसा (ENT) विषयातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. एप्रिल २०२५ मध्ये एमएस (ENT) पदवी प्राप्त केल्यानंतर ऑगस्ट २०२५ मध्ये उंब्रज येथे ‘विघ्नहर्ता क्लिनिक’ सुरू करून ग्रामीण भागातील रुग्णांना अत्याधुनिक व दर्जेदार ईएनटी उपचार उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली. गणेशोत्सवाच्या काळात तीन मोफत ईएनटी तपासणी शिबिरे, १ जानेवारी २०२६ रोजी विशेष मोफत तपासणी शिबिर तसेच मार्च २०२६ मध्ये आणखी एक शिबिर आयोजित करून त्यांनी शेकडो रुग्णांना उपचाराचा लाभ मिळवून दिला.
डॉ. पूजा शिंदे-कदम यांच्या वैद्यकीय कारकिर्दीतील सर्वात हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी घटनांपैकी एक म्हणजे कानाने ऐकू न येणाऱ्या एका चिमुकल्या मुलाला नवजीवन देण्याची घटना. जन्मजात श्रवणदोषामुळे त्रस्त असलेल्या त्या मुलाच्या उपचारासाठी सुमारे ३० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मुलाच्या पालकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने हा खर्च त्यांच्या आवाक्याबाहेर होता. त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून डॉ. पूजा शिंदे-कदम यांची भेट घेऊन मदतीची विनंती केली.
रुग्णाच्या परिस्थितीची जाणीव ठेवत डॉ. कदम यांनी स्वतः पुढाकार घेत एका स्वयंसेवी संस्थेशी समन्वय साधला. त्यांच्या प्रयत्नांमुळे त्या मुलावर अत्यल्प खर्चात शस्त्रक्रिया होऊ शकली आणि उपचारानंतर त्या मुलाला व्यवस्थित ऐकू येऊ लागले. या यशस्वी उपचारामुळे त्या मुलाच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. या अनुभवाविषयी बोलताना डॉ. पूजा शिंदे-कदम म्हणाल्या, “माझ्या वैद्यकीय कारकिर्दीतील हा सर्वात मोठा आणि समाधान देणारा क्षण आहे. एका सामान्य कुटुंबातील आई-वडिलांना आपल्या मुलाला पुन्हा ऐकू येऊ लागल्याचा जो आनंद झाला, तो शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. डॉक्टर म्हणून यापेक्षा मोठा पुरस्कार दुसरा असू शकत नाही.” रुग्णांच्या गोपनीयतेच्या वैद्यकीय नियमांचे पालन करत संबंधित मुलाचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.
९२ वर्षांची परंपरा असलेल्या ‘नवभारत समूहा’ तर्फे आयोजित ‘नवभारत हेल्थकेअर कॉन्क्लेव्ह २०२६’ हा महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर, रुग्णालये, आरोग्य संस्था आणि समाजसेवकांचा गौरव करणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय उपक्रम आहे. या व्यासपीठावर डॉ. पूजा शिंदे-कदम यांच्या कार्याचा गौरव झाल्याने उंब्रज, कराड आणि सातारा जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या पुरस्काराबद्दल विविध सामाजिक संस्था, वैद्यकीय क्षेत्रातील सहकारी, रुग्ण आणि नागरिकांनी डॉ. पूजा शिंदे-कदम यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक व वैद्यकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.






