अंड्याच्या दरात झाली विक्रमी वाढ; 15 दिवसांमध्ये 18 रुपयांनी अंडी महाग (सौजन्य - सोशल मिडीया)
मंचर : थंडी वाढल्यामुळे हॉटेल, ढाबे व अंडा भुर्जी व्यावसायिक या ठिकाणी अंड्याला प्रचंड प्रमाणात मागणी असून, अंड्याच्या बाजारभावात वाढ झाल्याने पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्याना सुगीचे दिवस आले आहे. ऐन थंडीत अंड्यापासून ऊर्जा निर्मिती होत असून, त्यातून प्रोटीन, कॅल्शियमची मात्रा मोठ्या प्रमाणात शरीराला मिळते. त्यामुळे थंडीच्या अगोदर शेकडा ६५० बाजारभाव होता. परंतु थंडीत अंडी शेकडा ६८० रुपयांच्या पुढे गेली असल्याने अंड्याचे बाजार भाव किरकोळ विक्री ८ रुपये प्रमाणे ९६ रुपये डझन अशी होत असल्याचे दिसून येत आहे.
अंड्याचे बाजार भाव गेल्या महिनाभरापासून टिकून असून, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यापर्यंत थंडी टिकून राहिल्यास अंड्याचे दर घाऊक बाजारात टिकून राहण्याची दाट शक्यता आहे, असे चांडोली येथील अंडी उत्पादक पोल्ट्री व्यावसायिक ग्रामपंचायत सदस्य गोविंद थोरात, निकेतन दैने आणि उद्योजिका माया शंकर थोरात यांनी सांगितले.
गावोगाव सुरू असलेले यात्रा उत्सव आणि सध्या थंडीमुळे अंडी, चिकन, मच्छी, मटणला हॉटेल, ढाब्यांवर मोठी मागणी वाढली असल्याचे दिसून येत आहे. थंडीमुळे हॉटेलमध्ये मांसाहार करणाऱ्यांची गर्दी दिसून येते, असं हॉटेल व्यवसायिक उद्योजक नितीन भालेराव, सोमनाथ भालेराव, रवी भालेराव, विनोद भालेराव, यशोधनचे तन्मय कानडे, तसेच एकलहरे येथील हॉटेलचे मालक संतोष डोके, अर्जुन डोके, रामचंद्र गाडे यांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा : पुणे पोलिसांची मोठी कारवाई; टेम्पो अडवून 18 लाखांचा गुटखा पकडला
अंडे खाण्याचे फायदे आणि तोटे
अंडे जेवढे चविष्ट आहे तेवढेच ते पौष्टिकही आहे. यामध्ये उच्च दर्जाचे प्रथिने आढळतात. जे तुमचे स्नायू दुरुस्त करण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी उपयुक्त मानले जातात. याशिवाय अंड्यांमध्ये व्हिटॅमिन B 12, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी 5 यासह इतर अनेक जीवनसत्वे आढळतात. सेलेनियम, फॉस्फरस आणि झिंक यासारखे पोषक घटक देखील अंड्यामध्ये आढळतात. एवढेच नाही तर त्यात ओमेगा – 3 ॲसिड आढळते, जे हेल्दी फॅट आहे. अशा प्रकारे पाहिल्यास अनेक आवश्यक पोषक तत्वांची कमतरता केवळ अंडेच पूर्ण करू शकते. अंड्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आढळते ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. याशिवाय यामध्ये कोलीन नावाचे पोषक तत्व देखील असते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते.
अंडे खाण्याचे तोटे
जर तुम्ही रोज अंडे खात असाल तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण काही लोकांना अंड्यांमुळे फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. डॉक्टरांच्या मते दररोज फक्त एक ते दोन अंडे खाणे आवश्यक आहे. जर तुम्ही जास्त प्रमाणात किंवा दररोज अंडे खात असाल तर शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते जी हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.