कर्जत : अन्याय झालेल्या शिवसैनिकांना (Shivsainik) न्याय मिळवून देऊ. शिंदे (CM Ekanth Shinde) यांनी वेगळा गट स्थापन केल्यावर त्यांच्यासह रिक्षावाले, पानवाले, महिलांना हिणवणे वाईट होते. हा त्यांचा अपमान असून अशा हिणवणाऱ्यांना उत्तर देऊ. शिंदे यांनी गद्दारी नाही, शिवसैनिकांच्या मनातलं ओळखले, अशी टीका राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केली. तसेच, संभाजी राजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांना शिवसेनेत (Shivsena) घेण्याचे ठरले होते, मात्र, त्यांच्याकडून तसे लिहून घेण्याचे ठरल्याचा गौप्यस्फोट सामंत यांनी केला.
शिवसेना-युवसेना कर्जत-खालापूरच्या वतीने रविवारी कर्जत येथील शेळके मंगल कार्यालय येथे जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, पाथरज येथील आदिवासी महिलांनी पारंपरिक नृत्य सादर केले.
यावेळी, शिवसेना प्रतोद भरत गोगावले, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, रेखाताई ठाकरे, उत्तर रायगड शिवसेना संपर्क प्रमुख विजय पाटील, उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, विधानसभा संघटक संतोष भोईर, तालुका विधानसभा संघटक शिवराम बदे, तालुका प्रमुख संभाजी जगताप, खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील, कर्जत संपर्क प्रमुख पंकज पाटील, शिवसेना सहसंपर्कप्रमुख उल्हास भुरके, युवासेना अधिकारी अमर मिसाळ, दिलीप ताम्हाणे, संतोष विचारे, अंकुश दाभणे, माथेरान शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांसह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, शिवसेना जिल्हा महिला संघटक रेखाताई ठाकरे आणि उपजिल्हा प्रमुख भाई गायकर यांनीही शिंदे गटाला पाठिंबा दिला.
शिवसेना एका कुटुंबाची मालकी नाही- थोरवे
शिंदे गटाला पाठिंबा हा मोठा उठाव आहे. कारण आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ मान्य नव्हती. शिवरायांच्या कार्यात रायगडचे योगदान होते, तसेच बाळासाहेबांचे विचार पोहोचवण्याचा हेतू असल्याचे आमदार महेंद्र थोरवे म्हणाले. जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपचे प्रत्येकी तीन आमदार होते, तर राष्ट्रवादीच्या एकमेव आमदार होत्या. मात्र पक्षप्रमुखांच्या चुकीच्या निर्णयामुळे शिवसेनेवर अन्याय झाला. गोगावले यांना पालकमंत्री करण्याची मागणी असताना बाळासाहेबांच्या विचारांना पायदळी तुडवले. त्यामुळे कोणी केली खरी गद्दारी, असा सवाल करतानाच आदित्य ठाकरे यांचा समाचार घेतला. गद्दारी कोणी केली हे आता उघड झाले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. तसेच विरोधकांना विषय नसल्याने आरोप होत असून शिवसेना कोणा एका कुटुंबाची मालकी नाही, असेही थोरवे म्हणाले.
मनोहर भोईर यांना ४० हजार मतांनी पाडणार
आम्हाला शिवसेनेने काम बघून एबी फॉर्म दिले आहेत. मनोहर भोईर यांनी आता आत्मपरीक्षण करावे. समाज असतानाही मारवाडी निवडून येणे याबाबत विचार करावा. त्यांचा कार्यक्रम केल्याशिवाय गप्प बसणार नाही. ४० हजार मतांनी पाडणार, असा समाचार थोरवे यांनी घेतला. त्याचप्रमाणे माथेरान आणि खोपोलीवर भगवा फडकवण्याचा निर्धार त्यांनी केला.
आमचे मिशन २०० प्लस- गोगावले
शिवसेनेचा मावळा कसा असावा हे आम्ही विधान भवनाच्या पायऱ्यांवर दाखवले. आम्ही गद्दार कसे? खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी बाहेर पडत आहेत. मुख्यमंत्री राष्ट्रवादीची साथ सोडत नसल्याने आम्ही आम्ही पाठिंबा काढला असे भरत गोगावले म्हणाले. सुभाष देसाई यांनी पदाधिकाऱ्यांना निधी दिला नाही, म्हणून हिंदुत्व टिकवण्यासाठी शिंदे यांना पाठिंबा दिला. पक्षप्रमुखांना मुख्य प्रवाहात येण्याचे सांगितले होते, कारण आमच्या आमदारांना डावलून अजित पवारांचे मिशन १०० सुरू झाले होते. त्यामुळे आमचे मिशन आता २०० अधिक असे ठरले आहे, असे गोगावले यांनी सांगितले. अनंत गीते यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात गावातल्या तरुणांनाही नोकऱ्या मिळून दिल्या नाहीत. गितेचे बॅनर लावू नका, त्यांना कोणतेही निमंत्रण देऊ नका, असे सुभाष देसाई यांचे आदेश होते, असा गौप्यस्फोट गोगावले यांनी केला.
२० वर्ष राष्ट्रवादीचा त्रास सहन केला- बारणे
मी युतीचा खासदार म्हणून निवडून आलो आहे. रायगडातील खासदारांनी कायम अन्यायावर आवाज उठवला. कारण पालकमंत्र्यांना चालवायचे काम रायगडचे खासदार करीत होते, असा टोला श्रीरंग बारणे यांनी लगावला. शिवसेनेच्या आमदारांवर अन्याय झाला. आमदार आणि खासदार बाहेर पडणे ही मोठी खदखद होती. त्याहीपेक्षा मी जवळपास २० वर्ष हे सहन करतोय, कारण रायगड आणि पुण्यात दोन्हीकडे पालकमंत्री राष्ट्रवादीचे होते. आता शिवसैनिकांना जाचातून मुक्ती मिळाली आहे, असेही बारणे म्हणाले.
आमदारांची दादागिरी सामान्यांसाठी- संतोष भोईर
कर्जतसाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणला. त्यामुळे पुढील २५ वर्षांची तुलना केली तरी निधी मोठा ठरेल. त्याचप्रमाणे आमदारांची दादागिरी ही सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आहे, असे संतोष भोईर म्हणाले.