आंबेगाव : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील रांजणी परिसरात गेले दोन दिवस पडलेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. झालेला पाऊस हा शेतपिकांना खऱ्या अर्थाने जीवदान देणारा ठरला आहे तर विहिरींच्या पाण्याची पातळी देखील वाढण्याची शक्यता आहे.
तालुक्याच्या पूर्व भागातील रांजणी, वळती, नागापूर, शिंगवे, भागडी, गांजवेवाडी, जाधववाडी, थोरांदळे, भराडी, चांडोली बुद्रुक आदी गावांना गेले दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे सोयाबीन आणि इतर शेतपिकांना जीवदान मिळाले आहे.
दरम्यान मागील एक महिन्यापासून पाऊस न झाल्याने हलक्या प्रतीच्या जमिनीतील सोयाबीन पीक आणि इतर पिके सुकून गेली होती. मध्यम कसदार जमिनीतील सोयाबीनसह खरीप पिके तग धरून होती. मात्र पाण्याचा ताण असल्याने सोयाबीनच्या फुलांची गळ व्हायला सुरुवात झाली होती. शेंगा निर्मितीवर परिणाम झाला त्यामुळे उत्पन्नातील घट निश्चित आहे. झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना काही प्रमाणात लाभ होणार असून हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी मदत होणार आहे. विहिरींची खालावलेली पाणी पातळी देखील झालेल्या पावसामुळे वाढणार आहे.
गेले दोन दिवस पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा उत्साह वाढला असून, ऊस लागवडी करण्यास सुरुवात झाली आहे. पावसाअभावी बहुतांशी शेतकऱ्यांनी नविन उसाची लागवड थांबवली होती. मात्र पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या अशा पल्लवीत झाल्या आणि शेतकऱ्यांनी पुन्हा ऊस लागवडीकडे लक्ष केंद्रित आहे. मात्र यंदा मुळातच पाऊस कमी पडल्यामुळे ऊस लागवड क्षेत्रामध्ये घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तालुक्यात पूर्व भागाप्रमाणे पश्चिम पट्ट्यात देखील संततधार पाऊस पडल्याने तालुक्याला वरदान ठरलेले डिंभे धरण पूर्ण क्षमतेने पाण्याने भरले आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. पश्चिम पट्ट्यातील भात पिकांना जीवदान मिळाले असून, भात पिके तरारली असल्याची चित्र पाहायला मिळते.
गेले दोन दिवस तालुक्यात सर्वत्र चांगला आणि समाधानकारक पाऊस पडल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. एकूणच कुकडी प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या डिंभे, माणिकडोह, येडगाव, वडज आणि पिंपळगांव जोगे या पाच धरणांपैकी डिंभे आणि वडज ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत तर येडगाव आणि पिंपळगावजोगे तसेच माणिकडोह धरण पाण्याने पुर्ण क्षमतेने भरण्यासाठी अद्यापही पावसाची आवश्यकता आहे.
गेले दोन दिवसापासून तालुक्याच्या पूर्व भागात पडलेला पाऊस शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरला आहे. शेतकऱ्यांची खरीपातील पिके कशीबशी येण्याची शक्यता आहे. भविष्यात पाण्याची टंचाई दूर होईल आणि उन्हाळ्यात शेतीबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटेल, असं जाधववाडी येथील शेतकरी म्हणाले.