पुणे : विवाह करण्यास नकार दिल्याने तरुणीवर चाकूने वार करण्यात आल्याची घटना खडकवासला परिसरात घडली. मांडवी गावात हा प्रकार घडला असून, उत्तमनगर पोलिसांनी एकाला अटक केली. सागर सचिन राऊत (रा. खडकवासला) असे अटक केलेल्याचे नाव आहे. राऊतने केलेल्या हल्ल्यात तरुणी जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत २१ वर्षीय तरुणीने उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पिडीत तरुणी येरवडा भागात राहायला आहे. राऊत आणि तिची ओळख होती. राऊतने तिच्याकडे विवाह करण्याबाबत विचारणा केली होती. तरुणीने विवाह करण्यास नकार दिला. त्याचा राग राऊतला आला होता. तो चिडला होता.
दरम्यान त्याने तरुणीला फिरायला जाऊ असे म्हणून खडकवासला भागातील मांडवी भागात नेले. शंकर मंदिराजवळ असलेल्या मोकळ्या जागेत त्यांच्यात पुन्हा विवाह करण्याच्या कारणावरून वाद झाला. राऊतने तरुणीवर चाकूने वार केले. सहायक पोलीस निरीक्षक चावरे तपास करत आहेत.