संग्रहित फोटो
पुणे/अक्षय फाटक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेत प्रथमच मोठा निर्णय घेतला असून, यामुळे कॉपी बहाद्दरांना आणि कर्मचाऱ्यांना दणका बसला आहे. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यातील तब्बल ७०१ परीक्षा केंद्रांवरील शिक्षक आणि इतर कर्मचारी बदलले आहेत. तेथे नवीन कर्मचारी व शिक्षक असणार आहेत. त्यामुळे यंदा दहावीच्या परीक्षेत गैरप्रकार होणार नाही, अशी अपेक्षा मंडळाने व्यक्त केली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी १ लाख ८० हजार मनुष्यबळ वापरणार आहे. राज्यातील ५१३० केंद्रांपैकी ७०१ केंद्राचा संपूर्ण स्टाफ बदलला आहे. कारण या केंद्रांवर गेल्या पाच वर्षात गैरप्रकार झाले आहेत.
इतक्या केंद्रीवरील अधिकारी, कर्मचारी बदलले
पुणे विभाग – १३९
नाशिक – ९३
नागपूर – ८६
मुंबई – १८
कोल्हापूर – ५४
कोकण – ०
लातूर – ५९
विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन सुविधा
परीक्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात, अशा विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरून समुपदेशन करण्यासाठी १० समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी जिल्हानिहाय प्रत्येकी दोन समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राज्यमंडळ व ९ विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करुन हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्याच्या सूचना
परीक्षेसाठी नियुक्त केलेले सहाय्यक परिरक्षक (रनर) परीक्षा कालावधीत बैठे पथक म्हणून मुख्य केंद्रावर कार्यरत राहणार आहे. तसेच त्यांनी परिरक्षण केंद्रावरून गोपनीय पाकिटे ताब्यात घेतल्यापासून ते परीक्षा केंद्रावर पोहोचेपर्यंत व वितरीत करेपर्यंत मोबाईलमध्ये चित्रीकरण्याची सूचना दिल्या आहेत.
संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेराव्दारे लक्ष
राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्रावर जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेराव्दारे निगराणी केली जाणार आहे. परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येईल. जिल्हयातील सर्व विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचा-यांच्या सहाय्याने कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रावर भरारी पथके व बैठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. जिल्हा प्रशासनाकडून परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित घटकांची फेशीयल रिकॉग्नेशन स्सिटीम (Facial Recognition System) व्दारे तपासणी होईल.
परीक्षेसाठी एकूण १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थी बसले आहेत. पैकी ८ लाख ६४ हजार १२० मुले ७ लाख ४७ हजार ४७१ मुली तसेच १९ तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) विद्यार्थी आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेने २१६५ विद्यार्थी वाढले आहेत. २३ हजार ४९२ माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून, राज्यातील एकूण ५ हजार १३० मुख्य केंद्रांवर परीक्षा पार पडणार आहे, अशी माहिती परिक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विभागनिहाय विद्यार्थी
पुणे – 275004
नागपूर – 151509
छत्रपती संभाजीनगर – 189317
मुंबई – 360317
कोल्हापूर – 132672
अमरावती – 163714
नाशिक – 202613
लातूर – 109004
कोकण – 17398
एकूण – 1611610