Free Ration Distribution: राजगुरूनगर परिसरात अलर्ट! १५ जूननंतर मोफत रेशन वितरण थांबणार
Rajgurunagar News: खेड तालुक्यातील रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची सूचना असून, मे आणि जून महिन्याचे मोफत धान्य येत्या १५ जूनपर्यंतच स्वस्त धान्य दुकानांमधून उपलब्ध होणार आहे. त्यानंतर धान्य वितरणाची प्रक्रिया थांबविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली आहे.
शासनाच्या निर्णयानुसार यंदा एप्रिल, मे आणि जून अशा तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, वितरण व्यवस्थेवर आलेल्या तांत्रिक आणि पुरवठा अडचणींमुळे नियोजनात बदल करण्यात आला. सध्या मे आणि जून या दोन महिन्यांचे धान्य स्वस्त धान्य दुकानांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले असून लाभार्थ्यांनी मुदतीपूर्वी धान्य उचलण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
प्रांताधिकारी अनिल दौंडे म्हणाले की, १५ जून ही धान्य वितरणाची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. १६ जूनपासून ई-पॉस मशीन बंद करण्यात येणार असल्याने त्यानंतर स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य वितरण करता येणार नाही. त्यामुळे सर्व रेशनकार्डधारकांनी वेळेत धान्य घेऊन शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा.
खेड तालुक्यात एकूण १९४ स्वस्त धान्य दुकाने कार्यरत असून, प्राधान्य कुटुंब योजनेतील ६० हजार ६६६ रेशनकार्डधारकांना केवायसीनुसार प्रतिमाणशी दरमहा ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ मोफत दिला जातो.
तर अंत्योदय योजनेतील ३२ हजार ५८ रेशनकार्डधारकांना दरमहा २२ किलो गहू आणि १३ किलो तांदूळ मोफत वितरित केला जात आहे. तालुक्यातील एकूण ३ लाख ४ हजार ५९९ लाभार्थ्यांना मोफत धान्याचा लाभ दिला जात असल्याची माहिती पुरवठा निरीक्षक महादेव कुंभार यांनी दिली.






