सलामीसाठी आलेल्या अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशीकडून मोठ्या भागिदारीची अपेक्षा होती. मात्र, अभिषेक केवळ २ धावांवर असताना ब्लेसिंग मुझारबानीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. दुसऱ्या टोकावर मात्र, वैभवने मैदानावर दमदार फलंदाजी करत ३१ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ४९ चेंडूंमध्ये आठ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ८१ धावा केल्या. वैभव आज शतकी खेळी करेल असे वाटत असतानाच माधेवेरेने वैभवला बाद केले. भारतासाठी वैभवचे हे दुसरे टी२० अर्धशतक होते. त्याचे पहिले अर्धशतक झिम्बाब्वेविरुद्ध आले होते.
वैभव व्यतिरिक्त इतर कोणताही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. ईशानने चार चौकारांसह २६ चेंडूंमध्ये २९ धावा केल्या पण सिकंदर रझाने त्याला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. वैभव आणि इशानने दुसऱ्या विकेटसाठी ७५ धावा जोडल्या. कर्णधार श्रेयस अय्यरने १८ चेंडूंमध्ये दोन चौकारांच्या मदतीने २७ धावा केल्या ब्रॅड इव्हान्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. रिंकू सिंगने २५ धावांचे योगदान दिले. दरम्यान, तिलक वर्मा ११ धावा करून नाबाद राहिला. झिम्बाब्वेकडून ब्रॅड इव्हान्सने दोन विकेट्स घेतले, तर सिकंदर रझा, ब्लेसिंग मुझारबानी आणि वेस्ली माधेवेरे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.
भारत : वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, रवी बिश्नोई, अशोक शर्मा, यश ठाकूर, मयंक यादव.
झिम्बाब्वे : ब्रायन बेनेट, बेन कुरन, डायन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), रायन बर्ल, वेस्ली मधवेरे (विकेटकीपर), तडवनाशे मारुमणी, ब्रॅड इव्हान्स, न्यूमन न्याम्हुरी, वेलिंग्टन मसाकादझा, ब्लेसिंग मुझाराबानी.






