जंतरमंतरवरील लाठीमाराचा कराडात निषेध; काम बंद आंदोलन करत वकिलांची घोषणाबाजी
कराड : नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार, शिक्षण क्षेत्रातील अनियमितता, तसेच विविध मागण्यांसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी व युवकांवर पोलिस आणि निमलष्करी दलाच्या जवानांनी केलेल्या लाठीमाराचे तीव्र पडसाद कराडात उमटले. या घटनेचा निषेध नोंदवित कराड बार असोसिएशनच्या वतीने एक दिवस काम बंद आंदोलन करण्यात आले.
यावेळी बार असोसिएशनचे सदस्य आणि वकील मोठ्या संख्येने कराड अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर एकत्र आले. आंदोलक युवकांवर करण्यात आलेल्या लाठीमाराचा निषेध करत वकिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर बळाचा वापर करणे निषेधार्ह असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
मोठी बातमी ! NEET परीक्षेबाबत केंद्र सरकारकडून महत्त्वपूर्ण घोषणा; आता NEET परीक्षा…
नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार, शिक्षण व्यवस्थेतील अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठविणाऱ्या युवकांच्या आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. संबंधित घटनेची गंभीर दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी, तसेच विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी वकिलांनी केली.
या आंदोलनात ॲड. प्रतापराव जानुगडे, ॲड. एम. टी. देसाई, ॲड. विठ्ठलराव राजे भोसले, ॲड. पी. के. घाडगे, ॲड. गौरी पाटील, ॲड. संजय महाडिक, ॲड. शिवाजीराव जाधव, ॲड. शंकर लोकरे, ॲड. राम होगले, ॲड. विद्याराणी साळुंखे, ॲड. अमित जाधव, ॲड. महादेवराव साळुंखे, ॲड. संभाजीराव मोहिते, ॲड. मानसिंगराव पाटील, ॲड. रवींद्र पवार, ॲड. चंद्रकांत कदम यांच्यासह बार असोसिएशनचे अन्य सदस्य व वकील सहभागी झाले.
जंतरमंतरवर राडा, इंटरनेट बंद, विद्यार्थी आक्रमक
कॉकरोच जनता पार्टीच्या २० जुलैच्या मोर्चानंतर बुधवारी रात्री साडेआठच्या दरम्यान जंतरमंतर पुन्हा मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठी चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या कारवाईनंतरही वातावरण तणावपूर्ण बनले आहे. कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) मुख्य प्रवक्ते आशुतोष रांका यांनी जंतरमंतर परिसरातील आज सकाळचे ताजे फोटो शेअर करत पोलिसांच्या कारवाईवर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे.






