संग्रहित फोटो
लातूर : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) येत्या १० जून रोजी २७ वर्षाची होईल. पक्षस्थापनेचा रौप्य महोत्सव उलटूनही दोन वर्षे झाली आहेत. तथापि, अखंड राष्ट्रवादी काँग्रेसफुटीनंतर लातूर जिल्ह्यात हा पक्ष एवढा विकलांग झाला आहे की, विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या १८ जून रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीत या पक्षाचे लातूर जिल्ह्यात केवळ दोनच मतदार आहेत. भूतपूर्व मंत्री आणि अहमदपूर-चाकूरचे माजी आमदार विनायकराव पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले. विनायराव पाटील यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्षपद रिक्त झाले आहे. आजही ते रिक्त आहे.
विनायकराव पाटील यांनी हातात धनुष्यबाण धरण्यापूर्वी त्यांच्या हातात शरद पवारांची तुतारी होती. जिल्ह्यातील सीनियर नेता म्हणून विनायकरांच्या गळ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने जिल्हाध्यक्ष पदाची माळ घातली. विनायकरावांची अवस्था ‘मोले घातले रडाया’ अशीच होती. अनुयायीच फारसे नसल्याने आणि पक्ष अखंड असताना जे कार्यकर्ते होते ते जहाज सोडून सत्ताधारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेल्याने वैतागलेल्या व काहीसे एकटे पडलेल्या विनायकरावांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला हाका घातल्या. खरे म्हणजे महायुतीत एकनाथ शिंदे यांची शिवसेनाही आहे. त्यामुळे भविष्यात एखादे महामंडळ मिळाले तर बघावे, असाही हेतू विनायकरांचा असावा. ते असो. विनायकरावांपूर्वी संजय शेटे जिल्हाध्यक्ष होते. परंतु बऱ्याच कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींना भेटून त्यांच्या विषयीची नाराजी व्यक्त केल्याने पक्ष श्रेष्ठींनी त्यांचा राजीनामा घेतला व त्यांच्या जागी माजी मंत्री विनायकराव पाटील यांची नियुक्ती केली. विनायकरावांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शप) च्या राजीनाम्यामुळे पक्षाचे जिल्हाध्यक्षपद रिक्त झाले. आजही ते रिक्त आहे.
निष्ठवंत म्हणतात, आम्हाला संधी हवी
इच्छुकांच्या मुलाखतींचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात आला असून, त्यांचा निर्णय आल्यानंतर आपल्याला कळवू असे इच्छुकांना सांगण्यात आले. या आठ इच्छुकांपैकी पाच जणांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा प्राध्यापक गंगापुरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. आपण पक्ष स्थापनेपासून या पक्षात कार्यरत आहोत. पक्षश्रेष्ठींनी त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे. परंतु बऱ्याचदा निष्ठावंत यांचा विचार होतच नाही असे दिसून येते, असेही गंगापुरे म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) चे लातूर जिल्हा निरीक्षक राजेसाहेब देशमुख (बीड) यांच्याशी पत्रकारांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, येत्या आठ दहा दिवसांत पक्षाला जिल्हाध्यक्ष मिळेल असे ते म्हणाले.
पदासाठी आठ जण इच्छुक
काही दिवसांपूर्वी म्हणजे २७ मे रोजी मात्र पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी मुंबईत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, कार्यालयीन सरचिटणीस रवींद्र पवार, व जिल्हा निरीक्षक राजेसाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. इच्छुकांमध्ये निवृत्त न्यायाधीश विजयकुमार बोडके, लातूरच्या जय क्रांती कॉलेजचे प्राचार्य प्रशांत घार, अहमदपूरचे सोमेश्वर कदम, डॉ. बापूसाहेब पाटील उजेडकर, बालाजी कदम, विजयकुमार राजेमाने, भरत सूर्यवंशी, प्रा. माधव गंगापुरे यांचा समावेश होता. मुलाखतीत प्रश्नकर्त्यांनी या इच्छुक उमेदवारांना काही जुजबी प्रश्न विचारले. जिल्हाभर फिरू शकता का ? पक्षाला वेळ देऊ शकता का? आर्थिक सोर्स काय? वगैरे प्रश्नांचा त्यात समावेश होता.






