महाराष्ट्र कृषी सेवा अंतिम गुणवत्ता यादी रखडली; MPSC च्या दिरंगाईचा उमेदवारांना पुन्हा फटका
दहिवडी : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या अंतिम निवड यादीस पुन्हा विलंब होत असल्याने उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मुख्य परीक्षा, मुलाखती तसेच तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होऊनही अंतिम निवड यादी अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नसल्याने हजारो उमेदवारांचे भविष्य अनिश्चिततेत अडकले आहे.
महाराष्ट्र कृषी सेवा भरती प्रक्रियेची सुरुवात सप्टेंबर २०२४ मध्ये झाली होती. त्यानंतर पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखती तसेच तात्पुरती गुणवत्ता यादी हे सर्व टप्पे पूर्ण झाले. मात्र, मुलाखत प्रक्रिया पूर्ण होऊन चार महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला असतानाही अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रिया जवळपास दोन वर्षांपर्यंत लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अंतिम निकालाबाबत आयोगाकडून कोणतीही स्पष्ट भूमिका किंवा कालमर्यादा जाहीर करण्यात आलेली नसल्याने उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक उमेदवारांनी इतर नोकरीच्या संधी तसेच पुढील स्पर्धा परीक्षांच्या तयारीवर मर्यादा आणून या भरती प्रक्रियेची प्रतीक्षा केली आहे. एका उमेदवाराने संताप व्यक्त करताना सांगितले की, “सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही अंतिम यादी प्रलंबित ठेवणे अन्यायकारक आहे. आयोगाने तात्काळ अंतिम निवड यादी जाहीर करावी.”
दरम्यान, कृषी विभागातील रिक्त पदांमुळे विविध प्रशासकीय कामांवर परिणाम होत असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे आयोगाने या प्रक्रियेला आणखी विलंब न लावता अंतिम निवड यादी जाहीर करून उमेदवारांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम द्यावा, अशी मागणी आता अधिक तीव्र होत आहे.
भरती प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे –
जाहिरात प्रसिद्ध : २६ सप्टेंबर २०२४
पूर्व परीक्षा : १ डिसेंबर २०२४
पूर्व परीक्षा निकाल : ८ एप्रिल २०२५
मुख्य परीक्षा : १८ मे २०२५
मुख्य परीक्षा निकाल : २४ डिसेंबर २०२५
मुलाखती : २३ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२६
गुणपत्रक प्रसिद्ध : १० फेब्रुवारी २०२६
तात्पुरती गुणवत्ता यादी : १८ मार्च २०२६
उमेदवारांच्या प्रमुख मागण्या काय?
– महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२४ ची अंतिम निवड यादी तात्काळ प्रसिद्ध करण्यात यावी.
– अंतिम निकालास होणाऱ्या विलंबामागील कारणे अधिकृतपणे स्पष्ट करण्यात यावीत.
– उमेदवारांच्या म्हणण्यानुसार, खरीप हंगाम तोंडावर असताना कृषी विभागाला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज आहे. अंतिम निवड यादीच्या प्रतीक्षेत सुमारे २५८ वर्ग-१ व वर्ग-२ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रखडल्या असल्याचे सांगितले जात आहे. या नियुक्त्या वेळेत झाल्यास कृषी विभागाच्या कामकाजाला गती मिळू शकते.






