Farmer Loan Waiver Scheme: राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार! दत्तात्रय भरणेंची घोषणा; सरकारवर ३६,५८५ कोटींचा भार
Farmer Loan Waiver Scheme: राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी कर्जमाफी योजनेचा लाभ तब्बल ५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार असून, यासाठी सरकारला ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
कर्जमाफीच्या अटी-शर्तीवरून राज्यभरात वाद सुरू असतानाच भरणे यांनी महत्त्वाचे संकेत देत, आवश्यक वाटल्यास निकषांमध्ये सुधारणा करण्यास सरकार तयार असल्याचे स्पष्ट केले, त्यामुळे विरोधक आणि शेतकरी संघटनांकडून होत असलेल्या टीकेदरम्यान सरकारने मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
कर्जमाफी योजनेबाबत बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की, सरकारने जाहीर केलेल्या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना मिळेल, असा अंदाज आहे. ते म्हणाले, सरकार आर्थिक अडचणीत असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. कर्जमाफीसाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कर्जमाफीच्या पात्रता निकषांवरून विरोधक आणि शेतकरी संघटना सरकारवर टीका करत आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना भरणे यांनी प्रथमच सुधारित भूमिकेचे संकेत दिले. अटीमध्ये सुधारणा करण्याची गरज असेल तर त्या केल्या जातील, असे ते म्हणाले, त्यांच्या या वक्तव्यामुळे सरकार कर्जमाफीतील काही निकषांचाबत फेरविचार करू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मे आणि जून महिन्यात झालेल्या वादळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील २४ जिल्ह्यांना फटका बसला. सुमारे १ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले, जळगाव, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले, अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. सरकारने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, नुकसानग्रस्त शेतक-यांना शक्य तितक्या लवकर मदत देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील कांदा उत्पादक शेतक-यांच्या प्रश्नावरही भरणे यांनी भूमिका मांडली. कांद्याच्या दरातील चढ़ उतारामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्याऱ्यांना दिलासा मिळायला हवा, असे त्यांनी सांगितले, सोमवारपासून नाफेड आणि एनसीसीएफमार्फत कांदा खरेदी सुरू करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
१२ ते १५ जूनदरम्यान घेऊनच पेरणी करावी. राज्यात सर्वत्र हवामानाचा अंदाज लक्षात एकसारखा पाऊस पडणार नाही. विशेषतः मराठवाडा आणि खानदेशातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता असल्याने घाईघाईने पेरणी करू नये, – दत्तात्रय भरणे, कृषिमंत्री
सध्या पेरणी हंगाम जवळ आल्यामुळे युरिया खताच्या उपलब्धतेबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. यावर बोलताना भरणे म्हणाले की, राज्यात सध्या पुरेसा खतसाठा उपलब्ध आहे. मात्र आंतरराष्ट्रीय संघर्ष आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे पुरवठा साखळीवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे आम्ही अतिरिक्त पुरवठ्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांनी घावरण्याचे कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.






