धुत्रोलीत हनुमान जयंतीनिमित्त भव्य यात्रा व जंगी शक्ती-तुरा!
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील धुत्रोली येथे हनुमान जयंती निमित्त १ एप्रिलपासून सुरू झालेल्या विविध धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून असून, आज (3 एप्रिल) होणाऱ्या यात्रेच्या भव्य सोहळ्याची सर्वत्र उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
धुत्रोली गावात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त मंदिरात मागील दोन दिवस अभिषेक, महापूजा, आरती, भजन-कीर्तन आणि हरिनाम सप्ताह यांसारख्या विविध कार्यक्रम यथासांग पार पडले. धुत्रोली गावाचा श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा व त्यानिमित्ताने आयोजित भव्य यात्रा हि फार वर्षांपासून सुरु असलेली परंपरा आजही अव्याहतपणे सुरु आहे. अनेक दशकांपासून अखंडपणे सुरू असलेली ही परंपरा आजही ग्रामस्थांनी जपलेली आहे.
मंडणगड तालुक्यात श्री हनुमान जयंती म्हटले की, यानिमित्ताने साजरी होणारी धुत्रोली गावाची यात्रा लोकांना आपसूक आठवते. फार पूर्वीपासून सुरू झालेली हनुमान जयंती व आयोजित भव्य यात्रेच्या परंपरेचे महत्व धूत्रोलीच्या ग्रामस्थांनी आजही अबाधित ठेवले आहे. हजारोंच्या संख्येनेयात्रेत तालुक्यातील व नजीकच्या तालुक्यातील भाविकांची गर्दी पाहायला मिळते.
पूर्वीच्या कालावधीत सुरु झालेल्या परंपरेचे जतन करताना धुत्रोली गावाचे ग्रामस्थांच्या एकतेचे दर्शन घडते. पूर्वीच्या काळी अगदी बैलगाडी किंवा मिळेल त्या वाहतुकीच्या साधनांनी तालुक्यातील कानाकोपऱ्यातील भाविक धुत्रोलीच्या जत्रेला आवर्जून हजेरी लावत असत. अनेक भाविक एकत्रित होऊन रात्रीच्या चांदण्याच्या उजेडात जत्रेला पायी चालत जाण्याचा आनंदी प्रसंग आजही बोलून दाखवतात. धुत्रोली गावाचा हनुमान जन्मोत्सव व जत्रोत्सव हा तालुक्यातील भाविकांचा जिव्हाळ्याचा व आस्तेच विषय असायचा. आजही तोच उत्साह धुत्रोली ग्रामस्थांसह तालुक्यातील भाविकांमध्ये या जत्रोत्सवात दिसून येतो. पिढ्यानपिढ्या सुरु असलेल्या धुत्रोली गावाचा हा श्री हनुमान जयंती उत्सवाची उत्सुकता बदलत्या काळात तसूभरही कमी न होता हि उत्सुकता उत्तरोत्तर वाढताना दिसते आहे.
यात्रेच्या निमित्ताने गावातील रस्ते, मंदिर परिसर रोषणाईने उजळून निघतात. पारंपरिक खेळ, शक्ती तुऱ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला सादरीकरणे आणि विविध मनोरंजनात्मक उपक्रम यामुळे जत्रेला विशेष रंगत येते. जत्रेमध्ये उभारण्यात आलेल्या विविध दुकाने, आकाशपाळणे, झुला, तसेच विविध खेळण्यांची प्रकार लहानांपासून मोठ्यांपर्यंत आकर्षण ठरतात.
यंदाच्या उत्सवात 3 एप्रिल रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबर शक्ती तुऱ्याच्या जंगी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय हनुमान सेवा मंडळ, हनुमान वाडी धुत्रोली, जय हनुमान सेवा मंडळ, मुंबई, सुसंगती महिला मंडळ, हनुमान वाडी, धुत्रोली चे पदाधिकारी व ग्रामस्थ मेहनत घेत आहेत.






