Manoj Jarange Mumbai Protest:जरांगे पाटलांना मुंबई पोलिसांचा सलग दुसरा झटका! आझाद मैदानावर उपोषणाला पुन्हा परवानगी नाकारली
जरांगे पाटील म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपासून मराठा समाज न्यायासाठी लढत आहे. समाजाच्या संयमाची वारंवार परीक्षा घेतली जात असून, मराठा समाजाला वेड्यात काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आता समाजाने पुन्हा एकदा एकजुटीने उभे राहण्याची वेळ आली आहे. “29 ऑगस्टला आंदोलनाला तीन वर्षे पूर्ण होत असून त्या दिवशी शेवटचा निर्णायक लढा सुरू होईल. एकही मराठा घरी थांबू नये,” असे आवाहन त्यांनी केले.
जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप करत सांगितले की, 58 लाख नोंदी उपलब्ध असूनही पात्र मराठा बांधवांना प्रमाणपत्रे दिली जात नाहीत. हैदराबाद गॅझेटमधील नोंदी वैध मानल्या जात असतील, तर त्यानुसार प्रमाणपत्रे देण्यास सरकार का टाळाटाळ करत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी ज्या मराठा बांधवांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांनी तातडीने अर्ज करण्याचे आवाहनही केले. “हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र मिळेपर्यंत आता थांबायचे नाही,” असे ते म्हणाले.
“गेली तीन वर्षे मराठा समाजाच्या लेकरांचे हाल होत आहेत. त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हा लढा आता अंतिम टप्प्यात आला आहे. 58 लाख नोंदींची प्रमाणपत्रे मिळेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही,” असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. त्यांनी आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्याचीही मागणी केली. “मराठा आंदोलकांवरील सर्व केसेस मागे घेतल्याशिवाय आंदोलन संपणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
सरकारने मराठा समाजासाठी विविध सवलती आणि योजना जाहीर केल्या असल्या तरी त्या प्रत्यक्षात लागू झालेल्या नाहीत, असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला. त्यांनी म्हटले की, उपोषणानंतर सरकारने ओबीसी सवलती लागू करण्याबाबत शासन निर्णय (जीआर) काढल्याचा दावा केला, मात्र संबंधित विभागांकडून त्याची अंमलबजावणीच झालेली नाही. सारथी संस्थेच्या योजना कागदावरच आहेत, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांमध्येही अनेक तरुणांना लाभ मिळालेला नाही, असा आरोप त्यांनी केला.
यावेळी जरांगे पाटील यांनी स्वतंत्र मराठा मंत्रालय स्थापन करण्याची मागणी पुन्हा एकदा लावून धरली. मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची गरज असल्याचे सांगत, सरकारला ते स्थापन करण्यात नेमकी अडचण काय आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
भाषणादरम्यान त्यांनी एक मोठा दावा करत “29 ऑगस्टला मराठा समाजाच्या प्रश्नांमध्ये अडथळे आणणाऱ्या 9 जणांची नावे जाहीर करणार” असे सांगितले. कोणत्याही पक्षाचे सरकार असो, मराठा समाजाच्या हिताचा निर्णय घेतला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
निवड झालेल्या मराठा उमेदवारांना नियुक्त्या दिल्या जात नसल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर दुजाभाव केल्याचा आरोप केला. “ओबीसी आरक्षणाचा लाभ दिला जातो, मग निवड झालेल्या मराठा तरुणांना नियुक्त्या का दिल्या जात नाहीत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांना भरलेले शुल्क परत मिळणार; सोमवारपर्यंत शाळा-महाविद्यालयांना आदेश
शेवटी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. “29 ऑगस्ट रोजी गावागावातील मराठे वाघासारखे मैदानात उतरतील. हा लढा समाजाच्या भविष्यासाठी असून, न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील,” असे ते म्हणाले. दरम्यान, जरांगे पाटील यांच्या या घोषणेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, सरकार 28 ऑगस्टपूर्वी काय निर्णय घेते आणि आंदोलन टाळण्यासाठी कोणती पावले उचलते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.






