फोटो सौजन्य - Social Media
वानकर नगर येथील देविका गॅस एजन्सीजवळ प्लॉट क्रमांक ३१४ मध्ये हे गोडाऊन आहे. सोमवारी सकाळी सुमारे ११.१४ वाजण्याच्या सुमारास येथे आग लागल्याची माहिती महापालिका अग्निशमन दलाला मिळाली. गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहने तसेच त्यांचे स्पेअर पार्ट्स आणि अन्य साहित्य साठवलेले होते. आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते, तर ज्वाळा दूरवरूनही दिसत होत्या.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधीक्षक राकेश साळुंखे यांच्या आदेशानुसार होटगी नाका अग्निशमन केंद्रातील पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी त्वरित बचावकार्य सुरू करत आग आणखी पसरण्यापूर्वी नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या सहा गाड्यांनी पाण्याचा मारा करत अवघ्या पाऊण तासात आग आटोक्यात आणली. अधीक्षक राकेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अधीक्षक अच्युतराव दुधाळ यांच्या नेतृत्वात जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळे गोडाऊनमधील मोठ्या प्रमाणातील दुचाकी वाहने आणि इतर साहित्य आगीपासून सुरक्षित ठेवण्यात यश आले. या कारवाईमुळे सुमारे दोन कोटी रुपयांचा माल वाचल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, आगीत स्पेअर पार्ट्स आणि इतर साहित्य जळून अंदाजे २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित ठिकाणी दुचाकींना अॅक्सेसरीज बसविण्याचे कामही सुरू असल्याची माहिती समोर आली. घटनेनंतर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.






