नीट परीक्षेमुळे रविवारी दिवसा मेगाब्लॉक रद्द! शनिवारी-रविवारी मध्यरात्री मध्य व पश्चिम रेल्वेवर विशेष ब्लॉक; लोकल सेवांवर परिणाम
नीट युजी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेकडून रविवारी ३ एप्रिल दिवसाचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. मात्र, आवश्यक देखभाल व अभियांत्रिकी कामांसाठी शनिवारी, रविवारी मध्य रात्री मुख्य मार्गावर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर विशेष ब्लॉक घेण्यात येणार असून, या कालावधीत लोकल सेवांवर मोठा परिणाम होणार आहे. सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप व डाउन धीम्या मार्गावर रविवारी रात्री १२.०५ ते पहाटे ५.०५ या वेळेत ब्लॉक राहील. या दरम्यान सीएसएमटीहून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील गाड्या विद्याविहारपर्यंत जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील.(फोटो सौजन्य – istock)
राज्यातील 364 पोलिसांना मिळणार बढती; सहाय्यक पोलिस निरीक्षक आता होणार पोलिस निरीक्षक
घाटकोपरकडून येणाऱ्या अप गाड्यांनाही याच पद्धतीने जलद मार्गावर वळवून प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात येणार आहेत. ब्लॉकपूर्वी डाउन दिशेची शेवटची लोकल शनिवारी रात्री ११.१६ वाजता सीएसएमटीहून टिटवाळाकडे सुटेल, तर अप दिशेची शेवटची गाडी कल्याणहून शनिवारी रात्री १०.२२ वाजता सुटेल. ब्लॉकनंतर सीएसएमटीहून कसाराकडे पहिली लोकल रविवारी पहाटे ५.०७ वाजता, तर टिटवाळाहून सीएसएमटीकडे पहिली गाडी रविवारी पहाटे ४.१२ वाजता धावेल.
दरम्यान, ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यान रात्री ११.४५ ते पहाटे ४.४५ या वेळेत दोन्ही दिशेने सेवा पूर्णपणे बंद राहतील, या कालावधीत काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, ब्लॉकपूर्वी ठाणे-पनवेल शेवटची लोकल शनिवारी रात्री ११.१४ वाजता सुटेल, तर वाशीहून ठाण्याकडे शेवटची गाडी शनिवारी रात्री १०.४५ वाजता धावेल, ब्लॉकनंतर पहिली सेवा ठाणेहून पनवेलकडे रविवारी पहाटे ५.१२ वाजता, तर पनवेलहून ठाण्याकडे पहाटे ४.३३ वाजता सुरू होईल.
मेट्रो-६ प्रकल्पासाठी स्टील गर्डर लॉचिंगच्या महत्त्वाच्या कामामुळे पश्चिम रेल्वेकडून राम मंदिर ते जोगेश्वरी स्थानकांदरम्यान तब्बल १० तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी (२ एप्रिल) रात्रीपासून ते रविवारी सकाळपर्यंत चालणाऱ्या या ब्लॉकमुळे उपनगरी लोकल सेवांवर परिणाम होणार असून, अनेक गाड्या रद्द, तर काहींचे मार्ग बदलून संचालन केले जाणार आहे. पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ९.३० वाजल्यापासून रविवारी सकाळी ७.३० वाजेपर्यंत सहाव्या मार्गावर हा १० तासांचा ब्लॉक लागू राहणार आहे. याशिवाय, अप जलद मार्ग आणि पाचव्या मार्गावर पहाटे १ ते ४ या वेळेत अतिरिक्त ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे वाहतूक व्यवस्थेवर अधिक ताण येण्याची शक्यता आहे. ब्लॉक कालावधीत सहाव्या मार्गावरील सर्व गाड्या बोरिवली ते अंधेरीदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.






