पुणे : हिंजवडीतील माहिती-तंत्रज्ञान (आयटी) केंद्राला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणाऱ्या पुणेरी मेट्रो प्रकल्पाच्या कामाने वेग पकडला आहे. मागील १४ महिन्यांत या प्रकल्पाचे सुमारे ४५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उरलेले काम मार्च २०२५ पर्यंत १८ महिन्यांत पूर्ण करण्याचे आव्हान आहे. या मार्गिकेसाठीच्या चार हजार सेगमेंटची उभारणी पूर्ण करण्यात आली असून, ८० टक्के खांबाची उभारणीही पूर्ण झाली आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पुणे मेट्रो मार्ग ३ चे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर टाटा समूहाने हाती घेतले आहे. त्याच्या कार्यान्वयासाठी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यात आलेली आहे. या प्रकल्पाला पुणेरी मेट्रो असे नाव देण्यात आले आहे. या प्रकल्पासाठीचे भूसंपादन पूर्ण झाले असून, मेट्रो मार्ग उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. प्रकल्प पूर्ण होण्याची मुदत मार्च २०२५ आहे. त्यामुळे आगामी काळात मेट्रो मार्गांची उभारणी, गणेश खिंड रस्त्यावरील दुमजली उड्डाणपूल आणि मेट्रो स्थानकांचे काम करण्याचे आव्हान आहे.
आतापर्यंत या मेट्रो मार्गाच्या ८० टक्के खांबाची उभारणी पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर या मार्गाच्या चार हजार सेगमेंटची उभारणी बुधवारी पूर्ण झाली. विशेष बाब म्हणजे, तीन हजार सेगमेंटच्या उभारणीनंतर केवळ ६९ दिवसांत आणखी एक हजार सेगमेंटची उभारणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी २३ जुलैला या प्रकल्पाचा पहिला सेगमेंट हिंजवडी येथे कास्ट करण्यात आला. त्यानंतर पुढील १४ महिन्यांच्या कालावधीत तब्बल चार हजार सेगमेंट उभे करण्यात आले आहेत.
[blockquote content=” हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील मेट्रोच्या चार हजार सेगमेंटची उभारणी ४०० दिवसांत (१४ महिने) झाली आहे. तसेच काम सुरू झाल्यापासून वर्षभरातच एकूण खांब उभारणीपैकी ८० टक्के खांब उभारणी पूर्ण करण्यात आली आहे. ” pic=”” name=” -आलोक कपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड”]
पुणेरी मेट्रोची सेगमेंट उभारणी
सेगमेंटची संख्या – कास्टिंगला लागलेला कालावधी
० ते १००० – २८५ दिवस
१००१ ते २००० – ९० दिवस
२००१ ते ३००० – ७९ दिवस
३००१ ते ४००० – ६९ दिवस