जावलीतील पाणी टंचाईवर मंत्र्यांची तातडीची ‘अॅक्शन’; शिवेंद्रराजेंच्या बैठकीत कठोर निर्देश
मेढा : जावली तालुक्यातील वाढत्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत तालुक्यातील विविध गावांतील पाणी टंचाईची सविस्तर चर्चा करण्यात आली असून, प्रशासनाला तात्काळ आणि प्रभावी उपाययोजना राबविण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
बैठकीदरम्यान नैसर्गिक जलस्रोत आटत चालल्याची गंभीर बाब समोर आली. यावर मंत्री शिवेंद्रराजेंनी प्रशासनाला विलंब न करता ठोस उपाययोजना करण्याचे आदेश दिले. विशेषतः ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र होत असल्याने नवीन विंधन विहिरी खोदण्याचे काम खाजगी ठेकेदारांमार्फत तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेची प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला. प्रत्येक गावात, घराघरात नळजोडणी पोहोचवण्याच्या कामात कुठलाही हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
Satara News : महादरे–हत्ती तलावाचा होणार कायापालट; ६ कोटींच्या योजनेतून पर्यटनाला चालना
कण्हेर धरणातील उपलब्ध जलसाठ्याचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर व्हावा यासाठी रोटेशन पद्धतीने पाणी वितरण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या. यामुळे सर्व गावांना समप्रमाणात पाणी मिळावे, हा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
बैठकीत उपस्थित ग्रामस्थांच्या तक्रारी मंत्री शिवेंद्रराजेंनी प्रत्यक्ष ऐकून घेतल्या. अनेक गावांमधील पाणीपुरवठा विस्कळीत असल्याच्या तक्रारींवर त्यांनी तत्काळ दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना जागेवरच उपाययोजना करण्याचे आदेश दिले. “जनतेला पाण्यासाठी त्रास होणार नाही, याची प्रशासनाने पूर्ण जबाबदारी घ्यावी,” असे ठाम निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे, कविता ओंबळे, पंचायत समिती सभापती सौरभ शिंदे, उपसभापती गोरख महाडिक, सदस्या सुनीता दुंदळे, शिल्पा शिंदे, अतिष कदम, प्रांताधिकारी आशिष बारकूल, तहसीलदार प्रवीण मुदगल, गट विकास अधिकारी डॉ. निलेश पाटील, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता आर. बी. साठे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाणी प्रश्नावर आता ‘तातडीची अंमलबजावणी’ हाच मंत्र
विंधन विहिरी खोदकामाला वेग
जलजीवन मिशनवर कडक नजर
कण्हेर धरण पाण्याचे रोटेशन
ग्रामस्थांच्या तक्रारींवर ऑन-द-स्पॉट निर्णय






