मनसे अध्यक्ष राज ठाकरे (फोटो- ani)
मुंबई: मीरा भाईंदर रस्त्यावर मागील दोन ते तीन तासांपासून जोरदार राडा सुरु होता. मीरा भाईंदरमधील व्यावसायिकांनी आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मराठी विरुद्ध हिंदी असा वाद चिघळला आहे. मोर्चाला परवानगी न मिळाल्याने मनसे आक्रमक झाली होती. पोलिसांची मनसे कार्यकर्त्यांबरोबर धक्काबुक्की देखील झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोस्ट करत आपल्या कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत.
राज ठाकरेंची पोस्ट काय?
एक स्पष्ट आदेश… पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही.
https://twitter.com/RajThackeray/status/1942609666099548580
माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये, आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही.
सध्या राज्यात मराठी-हिंदी भाषेचा वाद सुरू आहे. निशिकांत दुबे, संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानांमुळे हा वाद वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. मराठी भाषेसाठी मनसे आक्रमक झाली आहे. दरम्यान आपल्या पक्षकडून चुकीची विधाने किंवा आपल्या पक्षांची चुकीची भूमिका जाऊ नये म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्याना हा स्पष्ट आदेश दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
दोन तासांच्या राड्यानंतर अखेर मिळाली परवानगी
मराठी भाषिकांबाबत आणि भाषेबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे मनसे आणि ठाकरे गट आक्रमक झाला आहे. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे मीरा भाईंदर रोड येथे मोर्चा काढणार होते. मात्र पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली होती. या रस्त्यावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे पोलिसांनी परवानगी नाकारली होती. संघर्षमय ठिकाणाहून मनसे मोर्चा घेऊन जाण्यासाठी अडून राहिल्याने पोलिसांनी परवानगी दिली नाही अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यानंतर आक्रमक आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केली. तसेच आक्रमक आंदोलकांना ताब्यात घेत ठिय्या करणाऱ्या आंदोलकांना देखील ताब्यात घेतले. त्याचबरोबर पोलीस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की देखील झाली.
सरकार घाबरलं आणि मोर्चाला परवानगी दिली
मनसे नेते अभिजीत पानसे म्हणाले की, “प्रशासनाने, सरकारने हा मोर्चा येऊ नये यासाठी प्रयत्न केला. पोलिसी बळाचा वापर केला. दडपशाही केली. तरीही मराठी माणूस वाकला नाही हे पाहून ते झुकले. मोर्चाला परवानगी दिली गेली. एखादा आमदार मेहता आहे म्हणून काय फक्त मेहता लोकांचाच आहे की काय? सामान्य लोकांचा नाहीये का? एखादा व्यापारी उठून म्हणतो की महाराष्ट्रात हिंदीच बोलणार, त्याला आमच्या लोकांनी प्रसाद दिला. व्यापाऱ्यांच्या मोर्चाला पोलीस संरक्षण देऊन परवानगी दिली जाते. पण मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी नाकारली जाते? हा मराठी माणूस तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. ते घाबरले म्हणून मोर्चाला परवानगी दिली ” असा टोला त्यांनी लगावला आहे.