दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष एकत्र येणार (फोटो- टीम नवराष्ट्र)
पुणे: कुणासोबत एकत्र यायचे वा जायचे, हा अधिकार संविधानाने प्रत्येकाला दिलेला आहे. मात्र, अशा चर्चा कॅमेऱ्यासमोर होत नसतात, अशा शब्दांत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी सांगत मंगळवारी सावध भूमिका घेतली. अजितदादा आणि मी कुटुंब म्हणून कायम एकत्रच आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिन सोहळय़ानंतर बोलताना सुप्रिया सुळे यांनी एकीकरणाबाबतची भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, पवार कुटुंबीय कुटुंब म्हणून एकत्रच आहेत. माझे आणि अजितदादांचे जन्मापासून नाते आहे. त्यामुळे त्यात अंतर येण्याचा प्रश्नच येत नाही. कुटुंब म्हणून आम्ही एकच आहोत. त्यात कधीच बदल होऊ शकत नाही. राष्ट्रवादीच्या एकीकरणाची सध्या चर्चा होत आहे. मात्र, अशा चर्चा कॅमेऱयासमोर होत नसतात.
चारपैकी तीन निवडणुकांमध्ये त्यांनी मला मदत केली. एका निवडणुकीत विरोध केला. आम्ही एका ताटात जेवलो आहोत, हे ते विसरले असतील. पण, माझ्यावर संस्कार असून, मी कधीही ते विसरणार नाही, असे सांगत ज्यांनी हा मार्ग निवडला आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असेही त्यांनी सांगितले.
हुंडामुक्त महाराष्ट्रासाठी राज्यव्यापी दौरा
आपण सगळ्यांनी कानाकोपऱ्यात काम केले पाहिजे. पक्ष पूर्ण ताकदीने सामाजिक प्रश्नांसाठी काम करेल. ताकदीने लोकांसाठी काम करणार. केवळ सत्तेत जायचे हे लक्ष असता कामा नये. सुशिक्षित घरातून येणारी व्यक्ती हुंडय़ासाठी आत्महत्या करते हे दुर्दैवी आहे. आपल्याला हुंडामुक्त महाराष्ट्र घडवायचा आहे. त्यासाठी राज्यभरात ‘हुंडाबळी’ प्रकरणावर जागरुकता निर्माण करण्यासाठी लवकरच दौरा करण्यात येणार असल्याची घोषणाही सुळे यांनी केली.
Sharad Pawar- Ajit Pawar: शरद पवार- अजित पवार पुन्हा एकत्र येणार; सुप्रिया सुळे निर्णय घेणार?
शरद पवार- अजित पवार पुन्हा एकत्र येणार
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या गटाने लक्षणीय यश मिळवले, तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला अपेक्षित यश मिळाले नाही. यानंतर दोन्ही गटांमधील संपर्क वाढू लागला असून, विविध कार्यक्रम आणि बैठकीत शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात जोर चढला आहे. विशेष म्हणजे, दोन्ही गटातील कार्यकर्त्यांकडूनही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकसंघ व्हावी, अशी मागणी उघडपणे व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर, शरद पवार यांनी एकत्र येण्याच्या शक्यतेबाबत सकारात्मक संकेत दिले असून, अंतिम निर्णय मात्र खासदार सुप्रिया सुळे घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.