भायखळ्यात मलेरियाचा विळखा! आतापर्यंत मनपा दवाखान्यात १२ रुग्ण मलेरियाग्रस्त
मुंबई : भायखळा पश्चिम येथील ‘मंदार निकेतन’ इमारतीसह परिसरात मलेरियाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून, डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष आणि मंदार निकेतन रहिवासी मंडळाचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी मुंबई महापालिका आयुक्तांचे या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे. प्रशासनाकडून केवळ कागदोपत्री घोडे नाचवले जात असल्याचा आरोप करत त्यांनी संताप व्यक्त केला आहे. भायखळ्यात तातडीने स्वच्छ भारत अभियान राबवून मलेरियाचे निर्मूलन करावे, अशी मागणी केली आहे.
मंदार निकेतन इमारतीमध्ये अनेक नागरिक सध्या तापाने फणफणले आहेत. यावर तळेकर यांनी सांगितले की, एकट्या बाळासाहेब ठाकरे मनपा दवाखान्यात आतापर्यंत १२ रुग्ण मलेरियाग्रस्त आढळले आहेत. खासगी रुग्णालयातील आकडा धरल्यास ही संख्या कित्येक पटीने जास्त असू शकते. सुभाष तळेकर यांनाही शुक्रवारी ताप आल्याने त्यांनी रक्ताची चाचणी केली आहे.
DNA आधारित उपचारांची नवी पहाट! आयआयटी मुंबईच्या संशोधनातून अँटिबायोटिक उपचार पद्धतीत बदलाची चिन्हे
परिसरातील परिस्थिती अत्यंत भयावह असून ‘हाऊस गल्ल्या’ कचरा आणि सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत. काही ठिकाणी तर सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. वारंवार तक्रारी करूनही महापालिकेकडून केवळ वरवरची कारवाई केली जात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे, शुक्रवारी केलेल्या रक्त चाचणीचा रिपोर्ट मिळण्यासाठी सोमवारपर्यंत वाट पाहावी लागत आहे. ‘शुक्रवारचा रिपोर्ट सोमवारी येणार? हा रिपोर्ट काय अमेरिकेहून येणार आहे का?’ असा बोचरा सवाल तळेकर यांनी उपस्थित केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईच्या डबेवाल्यांना ‘स्वच्छ भारत अभियाना’चे दूत म्हणून नियुक्त केले आहे. डबेवाल्यांचा घटक म्हणून स्वतः सुभाष तळेकर यांनी अनेक संस्थांमध्ये या विषयावर व्याख्याने दिली आहेत. मात्र, त्यांच्याच इमारतीखाली सांडपाण्याची ही दुरवस्था असल्याने ‘दिव्याखाली अंधार’ अशी आपली स्थिती झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
मुंबईतील भायखळा परिसरात मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. विशेषतः पावसाआधीच डासांची वाढ आणि अस्वच्छतेच्या समस्या यामुळे परिस्थिती गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी थेट महापालिका आयुक्तांची भेट घेत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. डबेवाले दररोज शहरभर फिरत असल्याने त्यांच्यावर संसर्गाचा धोका अधिक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. भायखळा परिसरात डासांची पैदास रोखण्यासाठी फॉगिंग, स्वच्छता मोहीम, पाणी साचू न देणे यासारख्या उपाययोजना त्वरित राबवण्याची गरज व्यक्त केली. तसेच, नागरिकांमध्ये जनजागृती करून मलेरियावर नियंत्रण मिळवणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, महापालिका प्रशासनाने परिस्थितीची दखल घेत आवश्यक ती पावले उचलण्याचे संकेत दिले असून, लवकरच विशेष मोहीम राबवली जाण्याची शक्यता आहे.






